एल क्लासिकोमध्ये रियाल माद्रिद विजयी

विजयामुळे रियालने बार्सिलोनाला मागे टाकत ला लिगाच्या गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावले.

रियाल माद्रिद आणि बार्सिलोना हे स्पेनमधील सर्वोत्तम दोन संघ म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या दोन बलाढ्य संघांतील एल क्लासिको सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. रविवारी हे दोन संघ ला लिगा स्पर्धेत आमनेसामने आले आणि विनिसीयस ज्युनियर व मारियानो यांच्या गोलच्या जोरावर रियालने सामन्यात २-० अशी बाजी मारली. या विजयामुळे रियालने बार्सिलोनाला मागे टाकत ला लिगाच्या गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावले. २६ पैकी १६ सामने जिंकणार्‍या रियालच्या खात्यात ५६ गुण असून बार्सिलोनाचे ५५ गुण आहेत.

रियालला आपल्या घरच्या मैदानावर २०१४ नंतर बार्सिलोनाचा पराभव करण्यात अपयश आले होते. त्यातच मागील आठवड्यात त्यांना ला लिगामध्ये लेव्हांटे, तर चॅम्पियन्स लीगमध्ये मँचेस्टर सिटीने पराभूत केले होते. त्यामुळे या सामन्यात बार्सिलोनाचे पारडे जड मानले जात होते. या सामन्याच्या पूर्वार्धात बार्सिलोनाच्या लिओनेल मेस्सी आणि आर्थरला गोलच्या संधी मिळाल्या, पण त्यांनी मारलेले फटके रियालचा गोलरक्षक थिबो कोर्टवाने अडवले.

त्यामुळे मध्यंतराला गोलशून्य बरोबरी होती. उत्तरार्धात मात्र रियालने आक्रमक खेळ केला. याचा फायदा त्यांना ७१ व्या मिनिटाला मिळाला. विनिसीयसने अप्रतिम गोल करत रियालला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तर सामना संपायला काही सेकंद शिल्लक असताना मारियानोने गोल केल्याने रियालने हा सामना २-० असा जिंकला.

सेव्हिलची ओसासुनावर मात
युसेफ एन-नेसेरीच्या दोन गोलमुळे सेव्हिलने ला लिगाच्या सामन्यात ओसासुनावर ३-२ अशी मात केली. सेव्हिलकडून युसेफ एन-नेसेरीने २, तर ल्युकास ओकॅम्पोसने १ गोल केला. हा सेव्हिलचा २६ सामन्यांतील १३ वा विजय होता. त्यामुळे त्यांचे ४६ गुण झाले असून ते गुणतक्त्यात तिसर्‍या स्थानी आहेत. अ‍ॅटलेटिको माद्रिद आणि इस्पानियॉल यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत संपला.