Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा पृथ्वीचे दमदार पुनरागमन

पृथ्वीचे दमदार पुनरागमन

Subscribe

मुंबईची आसामवर ८३ धावांनी मात

सलामीवीर पृथ्वी शॉने पुनरागमनात केलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडकाच्या सामन्यात आसामवर ८३ धावांनी मात केली. डोपिंगमध्ये दोषी आढळल्यामुळे बीसीसीआयने पृथ्वीवर आठ महिन्यांची बंदी घातली होती. या बंदीचा कालावधी संपल्यानंतर त्याची सय्यद मुश्ताक अली करंडकाच्या अखेरच्या दोन साखळी सामन्यांसाठी आणि सुपर लीग फेरीसाठी मुंबईच्या संघात निवड झाली. मे महिन्यात झालेल्या आयपीएल स्पर्धेनंतर आपला पहिला सामना खेळणार्‍या पृथ्वीने रविवारी वानखेडे स्टेडियममध्ये आलेल्या चाहत्यांची निराशा केली नाही. त्याने आसामविरुद्ध ३९ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६३ धावांची खेळी केली.

या सामन्यात आसामने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मुंबईने निर्धारित २० षटकांत ५ विकेट गमावत २०६ धावांचा डोंगर उभारला. पृथ्वी आणि आदित्य तरे यांनी अप्रतिम फलंदाजी करत १३८ धावांची सलामी दिली. तरेने ८२, तर पृथ्वीने ६३ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकांत सिद्धेश लाडने अवघ्या १४ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ३२ धावा करत मुंबईला २०० धावांचा टप्पा पार करून दिला. आसामच्या रियान परागने ३० धावांच्या मोबदल्यात ३ गडी बाद केले.

- Advertisement -

२०७ धावांचा पाठलाग करताना आसामच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. मधल्या फळीतील रियान पराग (३८), रॉय (२२) आणि अमित सिन्हा (२२) यांनी चांगली फलंदाजी करत आसामच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र, त्यांना इतरांची साथ लाभली नाही. त्यामुळे आसामला २० षटकांत ८ बाद १२३ धावाच करता आल्या. मुंबईच्या धवल कुलकर्णी, शिवम दुबे आणि शम्स मुलानी यांनी प्रत्येकी २ विकेट्स मिळवल्या.

सातत्याने धावा करण्याचे लक्ष्य -पृथ्वी                                                                                        क्रिकेटच्या मैदानात दमदार पुनरागमन करणार्‍या युवा पृथ्वी शॉचे सातत्याने धावा करण्याचे लक्ष्य आहे. माझे जास्तीतजास्त धावा करत संघाला सामने जिंकवून देण्याचे लक्ष्य आहे. मी सातत्याने धावा करण्याचा प्रयत्न करणार आहे. भारतीय संघात माझे पुनरागमन होणार की नाही, हे निवडकर्ते ठरवतील, असे पृथ्वी म्हणाला. डोपिंगमध्ये दोषी आढळल्यामुळे बीसीसीआयने त्याच्यावर बंदी घातली होती. त्याविषयी पृथ्वीने सांगितले, माझ्यासोबत असे होईल याची मी कल्पनाही केली नव्हती. मी खूप निराश होतो. बंदी घातल्यानंतर २०-२५ दिवस माझ्यासोबत काय झाले आहे हे मला कळत नव्हते. मी थोडा वेळ लंडनमध्ये घालवला. मला १५ सप्टेंबरपर्यंत सराव करायचीही परवानगी नव्हती. मात्र, मी काही काळानंतर स्थिरावलो आणि मानसिकदृष्टया कणखर झालो. हा काळ माझ्यासाठी अवघड होतो, पण मला खूप शिकायला मिळाले.

- Advertisement -

पृथ्वी उत्कृष्ट खेळाडू -राठोड                                                                                                पृथ्वी शॉ हा उत्कृष्ट खेळाडू आहे, अशा शब्दांत भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी मुंबईकर सलामीवीराची स्तुती केली. पृथ्वीने मागील वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना विंडीजविरुद्ध शतक झळकावले. मात्र, दुखापत आणि त्यानंतर डोपिंगमध्ये दोषी आढळल्यामुळे घालण्यात आलेल्या बंदीमुळे पृथ्वीला भारतीय संघाबाहेर रहावे लागले आहे. त्याच्या अनुपस्थितीत मयांक अगरवाल, रोहित शर्मा यांना कसोटीत सलामीला येण्याची संधी मिळाली आणि त्यांनी या संधीचे सोने केले आहे. त्यामुळे पृथ्वी भारतीय संघात पुनरागमन करू शकेल का हे सांगणे अवघड आहे, असे राठोड म्हणाले. पृथ्वीचे भारतीय संघात कधी पुनरागमन होणार याबाबतचा निर्णय निवडकर्ते घेतील. मात्र, संघ व्यवस्थापनाच्या मते पृथ्वी हा उत्कृष्ट खेळाडू आहे. पृथ्वीचे भारतीय संघातील पुनरागमन, हे बंदीचा कालावधी संपल्यानंतर तो कशी कामगिरी करतो आणि इतर काही गोष्टींवर ठरेल.

- Advertisment -