नवी दिल्ली : यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने भारताचे दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्माला सर्वाधिक कमाई करण्याच्या बाबतीत मागे टाकले आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या मेगा लिलावात ऋषभ पंत हा आयपीएलच्या इतिहासतला सर्वात महागडा खेळाडू बनला होता, तर दुसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर होता. ऋषभ पंतने बीसीसीआयच्या करारामुळे विराट आणि रोहितला मागे टाकले आहे. तर श्रेयस अय्यरनेही रोहित शर्माला मागे टाकले आहे. (Rishabh Pant becomes highest-paid cricketer surpassing Virat Kohli and Rohit Sharma)
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 चा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे पार पडला. या लिलावात ऋषभ पंतवर बोली लागण्यास सुरुवात झाल्यानंतर त्याला विकत घेण्यासाठी लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु यांच्यात चढाओढ होताना दिसली. ऋषभ पंत 2 कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता. लखनऊ सुपर जायंट्सने 27 कोटींना विकत घेतले. यासह पंत 27 कोटी रुपये घेत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला. विशेष म्हणजे ऋषभ पंत हा बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्टॅक्टमधील बी ग्रेड क्रिकेटर आहे. यासाठी त्याला वर्षाला 3 कोटी रुपये मिळतात. तसेच लखनऊ सुपरजायंट्सकडून मिळालेल्या 27 कोटी रुपयांच्या पगारामुळे पंतची आता वार्षिक कमाई 30 कोटींवर पोहोचली आहे. यासह त्यांनी विराट आणि रोहितला मागे टाकले आहे.
हेही वाचा – Champions Trophy 2025 : पाकिस्तानचे यजमानपद जाणार की राहणार? आयसीसी घेणार अंतिम निर्णय
श्रेयसने रोहित शर्मा टाकले मागे
आयपीएलच्या मेगा लिलावात भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरसाठी बोली लागण्यास सुरुवात झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्सने त्याला विकत घेण्यासाठी बराच काळ स्पर्धा केली. अखेर पंजाब किंग्सने त्याला 26 कोटी 75 लाखांना विकत घेतले. ऋषभ पंतमुळे श्रेयसची महागडा खेळाडू बनण्याची संधी थोडक्यात हुकली, मात्र त्याने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा विक्रम मोडला आहे. कोलकाता नाइट राइडर्स संघाने मागील लिलावावेळी मिचेल स्टार्कला 24 कोटी 75 लाख रुपयांना विकत घेतले होते. विशेष म्हणजे श्रेयस अय्यरने बीसीसीआयचा करार नसतानाही रोहित शर्माला मागे टाकून सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे.
विराट-रोहितचा पगार किती?
दरम्यान, विराट कोहली हा बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्टॅक्टमधील A+ ग्रेड क्रिकेटपटू आहे. त्याला 7 कोटी रुपये वार्षिक पगार मिळतो. तसेच आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी रॉयल चैंलेजर्स बेंगळुरु संघाने विराट कोहलीला 21 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. अशा परिस्थितीत कोहलीची यंदा वार्षिक कमाई 28 कोटी रुपये असणार आहे. तर दुसरीकडे रोहित शर्माचाही कोहलीप्रमाणे A+ ग्रेडमध्ये समावेश आहे. त्याला बीसीसीआयकडून 7 कोटी रुपये पगार मिळतो. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला 16.3 कोटी रुपयांना रिटेन केले होते. अशा परिस्थितीत रोहित शर्माला यावर्षी 23.3 कोटी रुपये पगार मिळणार आहे.
हेही वाचा – Jasprit Bumrah : बुमराहच्या गोलंदाजीवर आक्षेप! आयसीसीचे नियम काय सांगतात?