घरक्रीडारोहितचा शतकांचा झपाटा

रोहितचा शतकांचा झपाटा

Subscribe

वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंडपाठोपाठ बांगलादेशविरुद्ध शतके फटकावून भारताचा सलामीवीर रोहित शर्माने श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या एकाच वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक ४ शतके झळकावण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. ४ शतकांसह वर्ल्डकपमध्ये ५४४ धावा तडकावून रोहितने बांगलादेशचा शाकिब अल हसन (५४२) आणि ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नर (५१६ धावा) यांना मागे टाकून सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांत अव्वल स्थानावर झेप घेतली. विशेष म्हणजे चारही शतकी खेळींदरम्यान रोहितला सुरुवातीलाच जीवदान लाभले होते. परंतु, जिगरबाज मुंबईकर रोहितने व्यावसायिक बाणा दाखवत शतकी मजल मारण्याचा पराक्रम केला. वनडेत रोहितच्या नावावर २६ शतके जमा असून, त्यात तीन द्विशतकांचा समावेश आहे.

वर्ल्डकपमध्ये सलामीच्या लढतीत रोहितने रबाडा, मॉरिस, ताहिर, शम्सी यांचा मुकाबला करत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १२८ चेंडूत शतकी मजल मारली. रोहितच्या वनडे कारकिर्दीतील हे सर्वात धीमे शतक. मात्र, कारकिर्दीतील सर्वात अनमोल शतक हेच असे रोहितला वाटते. ओल्ड ट्रॅफर्डवर रोहितने मोहम्मद आमिर, वहाब, हसन अली, इमाद वसीम, शादाब या पाकच्या आक्रमणाचा नेटाने मुकाबला करत ११३ चेंडूत ३ षटकार आणि १४ चौकारांनिशी १४० धावा चोपून काढल्या. शिखर धवनच्या गैरहजेरीत लोकेश राहुलच्या साथीने १३६ धावांची सलामी देणार्‍या रोहितने कर्णधार विराट कोहलीसह ९८ धावांची भागीदारी रचून पाकविरुध्द भारताच्या त्रिशतकी धावसंख्येत मोठा वाटा उचलला. पाकच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा रोहितला तसेच भारतालाही झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सावध सुरुवात करणार्‍या रोहितने पाकच्या गोलंदाजीवर सुरुवातीपासूनच प्रतिहल्ला चढवला.

- Advertisement -

कारकिर्दीच्या सुरुवातीला रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यात विलक्षण चुरस असायची. विराट कोहलीने भारतीय संघातील आपले स्थान पक्के केले, पण रोहितला मात्र भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी कडवा संघर्ष करावा लागला. २०११ च्या वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघात रोहितची निवड झाली नव्हती. २००८-०९ सालच्या मोसमात रणजीच्या अंतिम फेरीत शतके झळकावण्याचा पराक्रम करूनही वर्ल्डकपसाठी संघात निवड न झाल्याचे शल्य त्याला सलत होते. २००७ च्या मोसमात भारतीय संघात जागा पटकावणार्‍या रोहितनंतर आलेल्या युवा खेळाडूंना वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले. परंतु, रोहितने आपली जिगर सोडली नाही.

२०११ वर्ल्डकपनंतर त्याने विंडीज दौर्‍यात छान कामगिरी करून मालिकावीराचा किताब पटकावला. २०१३ मध्ये त्याने भारतीय संघात पुनरागमन केले. सलामीवीराच्या भूमिकेत तो प्रकर्षाने चमकला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. रोहितने गेली सहा वर्षे भारतीय वनडे संघात सलामीवीराची भूमिका नेटाने पार पाडताना २६ शतकांचा नजराणाही पेश केला आहे. विराट हा रोहितचा सुरुवातीला स्पर्धक होता. विराटला कर्णधारपदी बढती मिळाली, तर रोहितची उपकर्णधारपदी वर्णी लागली.

- Advertisement -

ईडन गार्डन्स आणि रोहितचे अनोखे नाते असून तिथेच त्याने श्रीलंकेविरुद्ध विक्रमी २६४ धावा फटकावल्या त्या १७३ चेंडूत. या विक्रमी खेळीदरम्यान त्याने ९ षटकार, ३३ चौकार लगावले. विंडीजविरुध्द कसोटी पदार्पणात त्याने शतक साजरे केले. ईडन गार्डन्सवरच! टी-२० क्रिकेट, खासकरून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे यशस्वी नेतृत्व करताना त्याने आपला ठसा उमटवला. बाराव्या वर्ल्डकप स्पर्धेआधी रोहितच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या आयपीएल स्पर्धेतील घवघवीत यशामुळे रोहितचा आत्मविश्वास दुणावला असून, वर्ल्डकप स्पर्धेत त्याची धावांची भूक वाढलेली दिसते. दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंडसारख्या संघाविरुद्ध शतके झळकावल्यानंतर बांगलादेशलाही रोहितच्या बॅटचा तडाखा बसला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -