New ODI Captain : रोहितकडे टी-२० नंतर एकदिवसीय संघाची कमान; कसोटीतपण घेतली रहाणेची जागा

टी-२० संघाच्या कर्णधारपदानंतर रोहित शर्माकडे बीसीसीआयने एकदिवसीय सामन्यांच्या कर्णधारपदाची देखील जबाबदारी सोपवली आहे

टी-२० संघाच्या कर्णधारपदानंतर रोहित शर्माकडे बीसीसीआयने एकदिवसीय सामन्यांच्या कर्णधारपदाची देखील जबाबदारी सोपवली आहे. सोबतच रोहित शर्माची कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रोहित दक्षिण आफ्रिकेत सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपासून कर्णधापदाची धुरा सांभाळणार आहे. मोठ्या कालावधी पासून मर्यादित षटकांच्या सामन्यांतील कर्णधारपदावरून वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत होते मात्र बीसीसीआयने बुधवारी या प्रश्नांना पूर्णविराम देत रोहितची कर्णधारपदी निवड केली आहे. बीसीसीआयने विराट कोहलीच्या जागेवर रोहित शर्माला भारतीय संघाचा कर्णधार बनवले आहे. यापूर्वी टी-२० विश्वचषकानंतर विराट कोहलीने टी-२० संघाच्या कर्णधारपद सोडले होते. दरम्यान कोहलीने आयपीएलमधील बंगळुरूच्या संघाच्या कर्णधारपदाचा देखील राजीनामा दिला होता.

विराट कोहलीने टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक तर्क वितर्क लावले जात होते की भारतीय संघाच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा बीसीसीआय कोहलीला सोपवणार की नाही. रोहितने न्यूझीलंडविरूध्दच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. आता दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी रोहित पहिल्यांदाच पूर्णवेळ कर्णधारपदी असणार आहे.

रोहितने आतापर्यंत १० एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्यामध्ये संघाचा ८ सामन्यात विजय तर २ सामन्यात पराभव झाला आहे. रोहित शर्माच्या कर्णधारपदात भारतीय संघाने यूएईत झालेल्या आशियाई कप स्पर्धेत विजय मिळवला होता. विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यांमध्ये ९५ सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी ६५ सामने जिंकले तर २७ सामन्यात पराभव झाला आहे आणि १ सामना बरोबरीचा राहिला आहे. तर टी-२० सामन्यांमध्ये विराटने ५० सामन्यांत संघाची कमान सांभाळली आहे, त्यामध्ये ३० सामन्यात विजय तर १६ सामन्यांत पराभव स्विकारावा लागला होता.

विराट एकदिवसीय सामन्यातील कर्णधार म्हणून

सामने- ९५
विजय- ६५
पराभव- २७
अनिर्णित- ३

विराट टी-२० सामन्यातील कर्णधार म्हणून

सामने- ५०
विजय- ३०
पराभव- १६
अनिर्णित- ४

विराट कोहलीसाठी एकदिवसीय आणि टी-२० फॉरमॅटमध्ये मोठ्या स्पर्धा जिंकू न शकणे हे त्याच्या कर्णधारपदापासून दूर जाण्याचे महत्त्वाचे कारण बनले आहे. कर्णधार म्हणून विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाला २०१७ मध्ये पाकिस्तानविरुध्द चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आणि २०१९ विश्वचषकाच्या उपांत्यफेरीत न्यूझीलंडविरुध्द पराभव पत्करावा लागला होता.


हे ही वाचा: http://IND vs SA : आफ्रिकन कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर; रोहितकडे एकदिवसीय संघाचे कर्णधारपद