IND vs AUS : चांगल्या सुरुवातीनंतर रोहित बाद; भारत २ बाद ६२

रोहितने ७४ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ४४ धावांची खेळी केली.

rohit sharma
रोहित शर्मा

नवख्या गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीनंतर रोहित शर्माने केलेल्या ४४ धावांच्या खेळीमुळे भारतीय संघ चौथ्या आणि निर्णायक कसोटीत ऑस्ट्रेलियाला झुंज देताना दिसला. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसामुळे अखेरच्या सत्रात एकही षटक टाकले गेले नाही. दिवसअखेर भारताची २ बाद ६२ अशी धावसंख्या होती. त्याआधी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३६९ धावांवर आटोपला. भारतीय गोलंदाजांनी तळाच्या फलंदाजांना मोठी खेळी करू दिली नाही. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लबूशेनने सर्वाधिक १०८ धावा केल्या. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील पाचवे शतक ठरले. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर आणि नटराजन यांनी प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या.

ऑस्ट्रेलियाच्या ३६९ धावांचे उत्तर देताना भारताच्या पहिल्या डावाची अडखळती सुरुवात झाली. पॅट कमिन्सने सलामीवीर शुभमन गिलला ७ धावांवर बाद केले. रोहित आणि पुजारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. रोहितने धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु, १०० वा कसोटी सामना खेळणारा ऑफस्पिनर नेथन लायनच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. रोहितने ७४ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ४४ धावांची खेळी केली. त्यामुळे दुसऱ्या दिवसअखेर भारताची २६ षटकांत २ बाद ६२ अशी धावसंख्या होती.

त्याआधी दुसऱ्या दिवशी ५ बाद २७४ वरून पुढे खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३६९ धावांत आटोपला. कर्णधार टीम पेनने अर्धशतक झळकावले, पण ५० धावांवर त्याला शार्दूल ठाकूरने बाद केले. कॅमरुन ग्रीनचे अर्धशतक मात्र हुकले. त्याला ४७ धावांवर वॉशिंग्टन सुंदरने माघारी पाठवले. यानंतर तळाच्या फलंदाजांना फारसे योगदान देता आले नाही.


हेही वाचा – IND vs AUS : नटराजनची कामगिरी कौतुकास्पद – वॉशिंग्टन सुंदर