नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलियात यांच्यामध्ये सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटीत भारताला 184 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 – 2025 मध्ये भारताला अंतिम फेरीत जाण्यासाठी हा सामना जिंकणे महत्त्वाचे होते. पण या पराभवामुळे आता भारतीय संघाचा अंतिम सामन्यात जाण्याचा रस्ता अवघड झाल्याचे चित्र दिसत आहे. पण चौथ्या कसोटीत एकवेळी सामना जिंकत आहे, असे वाटत असताना यामध्ये भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. यानंतर कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत या पराभवाची अनेक कारणे सांगितली. (Rohit Sharma Press Conference after loss in Forth Test Against Australia)
हेही वाचा : Parag Patil : ऑलिम्पिक पदक विजेता चालवतोय टॅक्सी; कोण आहे हा खेळाडू?
कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, “हा पराभव आमच्यासाठी खूप निराशाजनक आहे. आम्हाला या सामानाय्त अखेरपर्यंत कडवी झुंज द्यायची होती, पण दुर्दैवाने आम्ही ते करू शकलो नाही. आमच्याकडे हा सामना जिंकण्याची संधी होती, पण आम्ही त्याचा योग्य फायदा उचलू शकलो नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ 90 वर 6 बाद असताना आम्ही त्यांना सामन्यात पुनरागमन करू दिले. परिस्थिती कठीण आहे, हे आम्हाला माहिती होते. पण आम्ही यासाठीच खेळत होतो.” असे म्हणत त्याने हा पराभव काही चुकीच्या निर्णयांमुळे झाल्याचे कबुल केले.
पुढे पराभवाची कारणे सांगताना कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, “एक संघ म्हणून आम्ही काय करू शकलो असतो? याचा आम्ही एक संघ म्हणून विचार केला. ऑस्ट्रेलियाच्या टेलेंडरने आम्हाला खूप त्रास दिला. त्यांच्या तळाच्या फलंदाजांना बाद करण्यासाठी आम्ही अनेक डावपेच खेळले पण आम्ही अपयशी ठरलो. अखेरच्या विकेटसाठी केलेल्या भागीदारीत त्यांनी कडवी झुंज दिली. आम्हाला संधी होती, पण त्या संधीचे सोने आम्ही करू शकलो नाही. कदाचित त्याच क्षणी आम्ही सामना गमावला.” असे त्याने सांगितले. दरम्यान, भारतीय फलंदाज नितीश रेड्डीच्या कामगिरीबद्दल कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, “तो ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा आला आणि इथे कठीण परिस्थितीमध्ये खेळावे लागते. त्याने अशा परिस्थितीमध्येही चमकदार कामगिरी केली यात शंकाच नाही. तांत्रिकदृष्ट्या तो चांगल्या पद्धतीने खेळला. त्याचे भविष्य उज्ज्वल असून त्याच्याकडे यशस्वी होण्याची सर्व कौशल्ये आहेत.” असे म्हणत त्याचे कौतुक केले.