घरक्रीडाविंडीजविरुद्ध रोहितला मिळणार विश्रांती?

विंडीजविरुद्ध रोहितला मिळणार विश्रांती?

Subscribe

भारतीय संघाची निवड गुरुवारी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी भारतीय संघाची गुरुवारी निवड होणार आहे. विंडीजचा संघ या दौर्‍यात तीन टी-२० (६, ८, ११ डिसेंबर) आणि तीन एकदिवसीय (१५, १८, २२ डिसेंबर) सामन्यांची मालिका खेळणार असून एकदिवसीय मालिकेसाठी उपकर्णधार रोहित शर्माला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. तसेच मागील काही काळात सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश आलेल्या सलामीवीर शिखर धवनबाबत एम.एस.के प्रसाद अध्यक्षीय निवड समिती काय निर्णय घेते यावरही चाहत्यांची नजर असणार आहे. अध्यक्ष प्रसाद यांची ही शेवटची बैठक असू शकेल. त्यांचा आणि मध्य विभागाचे गगन खोडा यांचा चार वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे.

विंडीजविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौर्‍यावर जाणार आहे. या दौर्‍यात भारत पाच टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळेल. या मालिकेत कर्णधार विराट कोहलीसह रोहितवर भारतीय संघाची भिस्त असेल. त्यामुळे त्याला या दौर्‍याआधी विश्रांती देण्याचा निवड समिती निर्णय घेऊ शकेल. रोहितने यावर्षात आतापर्यंत २५ एकदिवसीय आणि ११ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कोहलीने रोहितपेक्षा तीन एकदिवसीय आणि चार टी-२० सामने कमी खेळले असून त्याला दोनवेळा विश्रांती देण्यात आली आहे.

- Advertisement -

रोहितचा सलामीचा साथी शिखर धवनला यावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकादरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यातच मयांक अगरवाल कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत असून स्थानिक एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ५० हून अधिकच्या सरासरीने आणि १०० हून अधिकच्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. त्यामुळे विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी लोकेश राहुलसह मयांकचाही सलामीवीर म्हणून विचार होऊ शकेल. टी-२० क्रिकेटमध्ये मॅचविनींग योगदान देणार्‍या वेगवान गोलंदाज दीपक चहरला एकदिवसीय संघातही संधी मिळू शकेल.

पंतचे स्थान धोक्यात?
युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने मागील काही एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांत निराशजनक कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याचे संघातील स्थान धोक्यात येण्याची शक्यता आहे. बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संजू सॅमसनची राखीव यष्टीरक्षक म्हणून निवड झाली होती. तसेच अनुभवी महेंद्रसिंग धोनीनेही आता सरावाला सुरुवात केली आहे. त्यामुळे पंतवरील दबाव अधिकच वाढणार आहे. पंतने याआधीच कसोटी संघातील आपले स्थान गमावले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -