घरक्रीडाIND vs ENG : भारताचा वरचष्मा; इंग्लंडच्या ११२ धावांचे उत्तर देताना दिवसअखेर...

IND vs ENG : भारताचा वरचष्मा; इंग्लंडच्या ११२ धावांचे उत्तर देताना दिवसअखेर ३ बाद ९९

Subscribe

अक्षरने आपल्या घरच्या प्रेक्षकांच्या साक्षीने खेळताना ३८ धावांतच ६ विकेट घेतल्या.   

अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन या फिरकी जोडगोळीने केलेल्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताचा वरचष्मा राहिला. अहमदाबाद येथे नव्याने बांधण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत असलेल्या या डे-नाईट कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या ११२ धावांतच संपुष्टात आला. गुजरातचा डावखुरा फिरकीपटू अक्षरने आपल्या घरच्या प्रेक्षकांच्या साक्षीने खेळताना ३८ धावांतच ६ मोहरे टिपत लागोपाठ दुसऱ्यांदा इंग्लंडच्या संघाची दाणादाण उडवली. तर ऑफस्पिनर अश्विनने २६ धावांत ३ विकेट घेतल्या. आपला १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या ईशांत शर्मालाही एक गडी बाद करण्यात यश आले. इंग्लंडच्या ११२ धावांचे उत्तर देताना पहिल्या दिवसअखेर भारताची ३ बाद ९९ अशी धावसंख्या होती.

झॅक क्रॉलीची एकाकी झुंज

या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. परंतु, कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरवण्यात इंग्लंडचे फलंदाज अपयशी ठरले. रिलायन्स एंडकडून मारा करणाऱ्या अक्षरची फिरकी विलक्षण प्रभावी ठरली. चेन्नई पाठोपाठ अहमदाबादमध्येही त्याने अश्विनच्या साथीने इंग्लंड फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले. इंग्लंडकडून सलामीवीर झॅक क्रॉलीने एकाकी झुंज देत ५३ धावांची खेळी केली. त्याच्या व्यतिरिक्त इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला वीस धावांचा टप्पा पार करता आला नाही. त्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या ११२ धावांवर आटोपला.

- Advertisement -

रोहितचे नाबाद अर्धशतक

११२ धावांचे उत्तर देताना भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलने सावध सुरुवात केली. परंतु, ५१ चेंडूत ११ धावा केल्यावर त्याला जोफ्रा आर्चरने बाद केले. तर चेतेश्वर पुजाराला जॅक लिचने खातेही उघडू दिले नाही. मात्र, रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी रचली. रोहितने अप्रतिम फलंदाजी करताना ६३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण झाले. कोहली मात्र दिवसाच्या अखेरच्या षटकात बाद झाला. त्याला लिचने २७ धावांवर बाद केले. दिवसअखेर रोहित ८२ चेंडूत ९ चौकारांसह ५७ धावांवर नाबाद होता.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -