IND vs ENG : रोहितच्या ‘या’ सल्ल्यामुळे धावा करण्यात आले यश – अजिंक्य रहाणे  

रोहित आणि रहाणेने चौथ्या विकेटसाठी १६२ धावांची भागीदारी रचली.

rohit sharma, ajinkya rahane
रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे

इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारताची ६ बाद ३०० अशी धावसंख्या होती. भारताच्या डावाची अडखळती सुरुवात झाली होती. भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल आणि कर्णधार विराट कोहलीने खातेही न उघडता बाद झाले. तर चेतेश्वर पुजारा केवळ २१ धावा करू शकला. परंतु, सलामीवीर रोहित शर्मा (१६१) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (६७) यांनी उत्कृष्ट फलंदाजी केल्याने भारताने तीनशे धावांचा टप्पा पार केला. ‘मी खेळपट्टीवर आल्यावर रोहितने मला सकारात्मक खेळ करण्याचा सल्ला दिला. त्याने आणि मी सकारात्मक खेळ केल्यामुळेच आम्हाला धावा करण्यात यश आले,’ असे पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर रहाणे म्हणाला.

नाणेफेक जिंकणे फायदेशीर

पहिल्या दिवसापासून खेळपट्टी फिरकीला अनुकूल असेल हे आम्हाला ठाऊक होते. त्यामुळे नाणेफेक जिंकणे आमच्यासाठी फायदेशीर ठरले. ‘या खेळपट्टीवर फार बचावत्मक खेळणे धोक्याचे ठरेल आणि आपण सकारात्मक खेळ केला पाहिजे,’ असे मी खेळपट्टीवर आल्यावर रोहित मला म्हणाला. माझाही आक्रमक आणि सकारात्मक खेळ करण्याचा प्रयत्न होता. पायांचा योग्य वापर करणे सर्वात महत्वाचे होते, असे रहाणेने सांगितले.

रोहित-रहाणेची शतकी भागीदारी

पहिली विकेट लवकर गमावल्यानंतर आम्ही चांगली भागीदारी रचणे गरजेचे होते. आधी रोहित आणि पुजाराने, तर त्यानंतर रोहित आणि मी चांगली भागीदारी केल्याचा आनंद आहे, असेही रहाणे म्हणाला. भारताने पहिली विकेट शून्य धावांवरच गमावली. त्यानंतर मात्र रोहित आणि पुजाराने दुसऱ्या विकेटसाठी ८५, तर रोहित आणि रहाणेने चौथ्या विकेटसाठी १६२ धावांची भागीदारी केली.


हेही वाचा – कसोटी तीन-साडे तीन दिवसांमध्ये संपेल; ‘या’ माजी क्रिकेटपटूचे विधान