Rohit Sharma मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा अंतिम सामना रविवार 9 मार्च रोजी होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. आयसीसी टी-20 वर्ल्डकपनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवण्यासाठी भारतीय संघ आता केवळ एक पाऊल मागे आहे. या सामन्यात भारतीय संघातील सर्व खेळाडूंची खेळी महत्त्वाची ठरणार आहे. विशेष म्हणजे भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या कारकिर्दीसाठी हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. एकीकडे या अंतिम सामन्याची सर्वत्र चर्चा रंगली असून, दुसरीकडे भारतीय संघाच्या कर्णधार पदावरूनही जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. कारण कर्णधार रोहित शर्मा या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कर्णधारपद सोडणार असल्याचं बोललं जात आहे. (Rohit Sharma Will step down as captain after Champions Trophy 2025 Discussions are rife in the cricket world)
क्रिकेटमधून निवृत्ती कधी घ्यायची हा सर्वस्वी निर्णय रोहित शर्माचा आहे. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा कदाचित कर्णधारपद सोडणार असल्याचं अनेक दिग्गज खेळाडूंचं मत आहे. त्यामुळे रोहित शर्मासाठी ही शेवटची आयसीसी स्पर्धा असू शकते. मात्र, रोहित शर्माने कर्णधारपद सोडल्यास भारतीय संघाचा पुढील कर्णधार कोण असेल, याचीही चर्चा क्रिकेटविश्वास रंगली आहे. त्यानुसार सध्या भारतीय संघाचा उपकर्णधार असलेल्या शुबमन गिल याच्यासह आणखी एक खेळाडूच्या नावाचीही चर्चा आहे.
2023 नंतर आगामी आयसीसी वर्ल्डकप चार वर्षांनी म्हणजेच 2027साली होणार आहे. या वनडे वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर भारतीय वनडे संघाचा कर्णधार बदलला जाईल, असे बोलले जात आहे. मात्र, रोहित शर्मानंतर वनडे संघाचा कर्णधार कोण असेल, असा सवाल उपस्थित झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुबमन गिल याच्याशिवाय हार्दिक पांड्या देखील कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. हार्दिकने यापूर्वी टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. अशा परिस्थितीत, जर निवडकर्त्यांनी हार्दिकवर विश्वास दाखवला तर गिल उपकर्णधारपदी कायम राहील. पण जर गिल आणि हार्दिक यांच्यावर एकमत झाले नाही, तर अशा परिस्थितीत तिसरा दावेदार देखील शर्यतीत उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात तिसरा दावेदार हा के. एल. राहुल असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा – Champions Trophy Final : भारत आणि न्यूझीलंड फायनल मोफत कुठे पाहू शकता? जाणून घ्या…