रोहितला संधीसाठी वाट पहावी लागणार!

gautam gambhir
गौतम गंभीरचे विधान

उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी या मधल्या फळीतील फलंदाजांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दमदार कामगिरी केली. या दोघांवर संघ व्यवस्थापनाने दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थकी लावल्याने रोहित शर्माला कसोटी संघातील संधीसाठी वाट पहावी लागणार, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने व्यक्त केले. एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणार्‍या रोहितला कसोटी क्रिकेटमध्ये फारसे यश मिळालेले नाही.

रोहितला कसोटी संघातील संधीसाठी वाट पहावी लागणार आहे. रहाणे आणि विहारी पहिल्या कसोटी सामन्यात उत्तम खेळले. त्यामुळे रोहितला इतक्यात कसोटी सामना खेळायला मिळेल असे मला वाटत नाही. मात्र, त्याला जेव्हा संधी मिळेल, तेव्हा त्याने त्या संधीचे सोने केले पाहिजे, असे गंभीर म्हणाला.

रहाणेने पहिल्या कसोटीत ८१ आणि १०२ धावांची खेळी करत सामनावीराचा पुरस्कार मिळवला. रहाणेबाबत गंभीरने सांगितले, रहाणेने मोठी खेळी केली याचे मला आश्चर्य वाटले नाही. त्याला स्वतःसाठी आणि संघासाठी त्या शतकाची गरज होती. तुम्ही जेव्हा शतक करता आणि संघ सामना जिंकतो, तेव्हा खूप आनंद होतो.

पंतला वगळण्याचा विचारही नको!

रिषभ पंतला वेस्ट इंडिज दौर्‍यात चांगले प्रदर्शन करण्यात अपयश आले आहे. मात्र, असे असतानाही त्याला संघातून वगळून अनुभवी वृद्धिमान साहाला संधी देणे चुकीचे ठरेल, असे गंभीरला वाटते. पंतने कसोटी क्रिकेटमध्ये ४८ च्या (खरे तर ४५.४३) सरासरीने धावा केल्या आहेत. त्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये जाऊन शतके लगावली आहेत. त्यामुळे त्याला संघातून वगळणे योग्य ठरणार नाही. रोहितप्रमाणेच साहाला कसोटी क्रिकेटमधील संधीसाठी वाट पहावी लागणार आहे. साहा नसताना पंतला संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले, असे गंभीर म्हणाला.