रूटची मुळं भारतात!

रूट अन् भारत यांचं अतुट नातं आहे. रूटने कसोटी पदार्पण केले नागपूरला 2012 मध्ये, त्याची 50 वी कसोटी होती विशाखापट्टनमला, तर 100 वी कसोटी चेन्नईला! भारताविरूद्धच्या मालिकेत इंग्लंड संघ बॅकफुटवर असल्याची जाणीव कर्णधार रूटला आहे. गेल्या 8 वर्षात भारताने मायदेशात 34 पैकी, 28 कसोटी जिंकल्या असून केवळ एकाच कसोटीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. रूटने कसोटी पदार्पण केले 2012, नागपूर कसोटीत. इंग्लंडने ही मालिका 2-1 अशी जिंकली, तब्बल 28 वर्षानी इंग्लंडने भारतात कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली.

england captain joe root
जो रूट

भारत-इंग्लंड यांच्यातील 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेला चेन्नईच्या ऐतिहासिक चेपॉकवर (चिदंबरम स्टेडियम) सुरुवात झाली असून विराट कोहली-जो रूट या उभय कर्णधारांच्या कामगिरीवर सार्‍यांच्या नजरा असतील. चेपॉकची कसोटी ही रूटच्या कारकिर्दीतील शतकी कसोटी. या शतकी कसेाटीत रूटने शतक झळकावून 9 दिग्गज फलंदांजाच्या यादीत स्थान पटकावले. माईक कौड्री, जावद मियांदाद, गॉर्डन ग्रिनिज, अ‍ॅलेक स्टुअर्ट, इंझमाम-उल-हक, रिकी पॉन्टिंग, ग्रॅमी स्मिथ आणि हाशिम आमला यांच्या मांदियाळीत जो रूटने स्थान पटकावले आहे.

रूट अन् भारत यांचं अतुट नातं आहे. रूटने कसोटी पदार्पण केले नागपूरला 2012 मध्ये, त्याची 50 वी कसोटी होती विशाखापट्टनमला, तर 100 वी कसोटी चेपॉक,चेन्नईला ! श्रीलंकेत नुकत्याच आटोपलेल्या कसोटी मालिकेत 400 हून अधिक धावा रूटने फटकाविल्या. 1 द्विशतक शिवाय 186 धावा त्यांने तडकाविल्या. या शतकी खेळींदरम्यान रूटने स्वीपचा सढळ वापर केला. त्याच्या स्वीपच्या फटक्यामुळे ग्रॅहम गुच, माईक गॅटींग यांची आठवण येते. भारतीय उपखंडातील खेळपट्ट्यांवर फिरकीचा मुकाबला करताना स्वीपचा फटका फायदेशीर ठरतो. फिरकीला सामोरे जाण्याचे रूटचे तंत्र चांगले असून भक्कम बचाव ही त्याची जमेची बाजू.

भारताविरूद्धच्या मालिकेत इंग्लंड संघ बॅकफुटवर असल्याची जाणीव कर्णधार रूटला आहे. गेल्या 8 वर्षात भारताने मायदेशात 34 पैकी, 28 कसोटी जिंकल्या असून केवळ एकाच कसोटीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. रूटने कसोटी पदार्पण केले 2012, नागपूर कसोटीत. इंग्लंडने ही मालिका 2-1 अशी जिंकली, तब्बल 28 वर्षानी इंग्लंडने भारतात कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली. त्यानंतर मात्र (2012) भारताने मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही!

मायकेल वॉन हा इंग्लंडचा सर्वात यशस्वी कर्णधार. 26 विजय त्याच्या खात्यात जमा असून त्याच्या विक्रमाशी बरोबरी करण्यात रूटला एका विजयाची गरज आहे. भारत दौर्‍यात कोहलीच्या संघाचे ‘विराट’ आव्हान रूटच्या इंग्लंड समोर असेल. शतकी कसोटी खेळणार्‍या 30 वर्षीय रूटने 4 द्विशतकांसह 20 शतके, 49 अर्धशतकांसह 8377 धावा फटकाविल्या असून (शुक्रवार पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत)अ‍ॅलीस्टर कुक (12472), ग्रॅहम गूच (8900), अलेक स्टुअर्ट (8463) यांच्या नंतर सर्वाधिक कसोटी धावा फटकाविण्यार्‍या इंग्लडच्या फलदांजात रूट चौथ्या क्रमांकावर आहे.

‘कोहली वि.रूट’ असे या मालिकेचे वर्णन करता येईल. दोघेही आयसीसी फलंदाजांच्या रँकींगमध्ये अव्वल पाचात आहे. दोघेही आपआपल्या संघाचे भक्कम आधारस्तंभ असून त्यांचा खडूसपणा वाखाणण्याजोगाच. प्रतिकूल परिस्थितीत आपला खेळ उंचावण्याची क्षमता त्यांच्यात आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली ‘नवा भारतीय संघ आकाराला येतोय. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंतसारख्या खंबीर तसेच आक्रमक खेळांडूंचा उत्तम मिलाफ भारतीय संघात दिसून येतो.

इंग्लंडची सलामीची जोडी भरवशाची वाटत नाही.रूट, बेन स्टोक्स, यांचा अपवाद वगळता इंग्लंडची फलंदाजी ठिसूळ वाटते. जॅक लिच, डॉम बेेस या फिरकी जोडगोळीसह अनुभवी अष्टपैलू मोईन अली या फिरकी त्रिकुटाचा रूटला वापर करता येईल. लिचच्या डावखुर्‍या फिरकीने तसेच ऑफस्पिनर बेसने श्रीलंकेत 22 विकेट काढल्या. परंतु रोहीत शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अंजिक्य रहाणे, डावखुरा रिषभ पंत या दणकट भारतीय फलंदाजासमोर लिच-बेस यांचा कस लागेल. जिमी अँडरसन,स्टुअर्ट ब्रॉडसारखी सर्वांत अनुभवी अन एक हजाराहून अधिक कसोटी बळी मिळविणारी तेज जोडगोळी रूटकडे मौजुद असली तरी भारतीय खेळपट्ट्यांचा विचार करता ब्रॉड, अँडरसन ही जोडगोळी एकसाथ खेळण्याची शक्यता कमीच! वर्ल्ड कप विजयास मोलाची भूमिका बजावणार्‍या बेन स्टोक्सवर इंग्लंडची मदार असेल.

वर्षभराच्या विश्रांतीनंतर भारतात कसोटी क्रिकेटला पुन्हा सुरवात होत आहे. कर्णधार विराट कोहलीची इंग्लंडविरूद्ध कामगिरी (खासकरून भारतात) चांगलीच झाली आहे. चार वर्षांपूर्वी इंग्लंडविरूद्ध भारतातील मालिकेत 4-0 असा सफाईदार विजय मिळवित असताना कोहलीची बॅट तळपली. या मालिकेत 631 धावा फटकाविताना 3 शतके (1 द्विशतक) शिवाय 2 अर्धशतके झळकाविले. परंतु राजकोट कसोटीच्या दुसर्‍या डावात त्याने केलेल्या नाबाद 49 धावा अनमोल ठरल्या. पुजारा रहाणे सारखे खंदे वीर माघारी परतल्यावर विराटने एक बाजू लावून धरत सामना अनिर्णित राखला, मालिकेतील ही एकमेव अनिर्णित कसोटी पुढचे चारही सामने भारताने लिलया जिंकले.

जसप्रीत बुमराह गेली 2-3 वर्षे विलक्षण सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहे. गुजरातच्या या युवकाने परदेशात आपली छाप पाडली मायदेशात प्रथमच कसोटी सामना खेळणार्‍या बुमराहकडून मोठ्या अपेक्षा असून तो झटपट ब्रेक-थ्रु मिळवून देण्याची कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. त्याला साथ लाभेल अनुभवी इशांत शर्माची. 97 कसोटी सामन्यांचा प्रदीर्घ अनुभव इशांंतकडे असून कसोटी सामन्यांचे शतक साजरे करण्यास तो उत्सुक आहे. भारतातील खेळपट्ट्या फिरकीला अनुकुल असतात ही सर्वश्रुत बाब. रविचंदन अश्विन, वॉशिग्ंटन सुंदर ही तामिळनाडुची ऑफस्पिनरची जोडी एकसाथ खेळेल. याआधी प्रसन्ना, वेंकटराघवन ही ऑफस्पिनरची जोडी भारताकडून 14-15 कसोटी एकत्र खेळली.

रवींद्र जडेजाला दुखापत झाल्याने भारताला चांगल्या डावखुर्‍या फिरकी गोलंदांजाची उणीव जाणवेल. कुलदीप यादवच्या चायनामन फिरकीबाबत कर्णधार विराट कोहलीला फारसा विश्वास, भरवसा वाटत नसावा. ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण दौर्‍यात कुलदीप ‘टुरिस्टच’ राहिला. इंग्लंडविरूद्ध घरच्या खेळपट्ट्यांवर कुलदीपला संधी मिळावी अशी अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यात आपल्या फटकेबाज खेळाने भारताच्या मालिका विजयात मोठी भूमिका बजावण्यार्‍या रिषभ पंतला संपूर्ण मालिकेत संधी मिळेल अशी आशा आहे.

पितृत्वाच्या रजेनंतर विराट कोहली भारतीय संघात पुनरागमन करत आहे. पंधरवड्यापूर्वी प्रभारी कर्णधार अंजिक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच 2-1 असे हरवून भारतीय क्रिकेटच्या 9 दशकांच्या कसोटी क्रिकेट इतिहासातील एका संस्मरणीय विजयाची नोंद केली. कोविडच्या थैमानामुळे जगरहाटीत झपाट्याने बदल होत असताना क्रिकेटची दुनिया सुरूच राहिली. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंकेत कसोटी क्रिकेट तसेच संयुक्त अरब अमिरातीत आयपीएलची स्पर्धा रंगली.

क्रिकेट हा तर भारतीयांचा लाडका, आवडता खेळ. ब्रिटिशांनी भारतात रूजविलेल्या क्रिकेटच्या या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले असून भारत-इंग्ंलड कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याना भारतात वर्षभरांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरूवात होते आहे हा शुभशकुनच! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची उपांत्य झुंज म्हणून भारत-इंग्लंड मालिकेत चुरस असेलच. न्यूझीलंडचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित असून 14 -18 जून 2021 दरम्यान लॉर्डसवर अंतिम सामना रंगेल.

भारत-इंग्ंलड यांच्यातील कसोटी मालिकेचा इतिहास रंजक असून त्याला 9 दशकाची परंपरा लाभली आहे. उभय संघांमध्ये आतापर्यंत 32 मालिका झाल्या असून त्यापैकी 10 भारताने तर 18 इंग्ंलडने जिंकल्या आहेत. या जुन्या प्रतिस्पर्ध्यामध्ये 122 कसोटी सामने झाले असून भारताने 26 तर इंग्ंलडने 47 विजय संपादले आहे. 49 कसोटी अनिर्णित राहिल्या. 122 पैकी 60 कसोटी भारतात झाल्या असून त्यापैकी 19 भारताने जिंकल्या,13 गमावल्या तर 28 अनिर्णित राहिल्या.