जर्सीचा रंग वेगळा, निकाल तोच !

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सलग सहावा पराभव

Rcb

कागिसो रबाडा आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या अप्रतिम प्रदर्शनामुळे दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ४ विकेट राखून पराभव केला. हा बंगळुरूचा या मोसमातील सलग सहावा पराभव होता, तर त्यांना एकही सामना जिंकता आलेला नाही. गो ग्रीन मोहिमेअंतर्गत बंगळुरूचा संघ या सामन्यात हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरला होता.या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बंगळुरूच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी ६६ धावांत ३ विकेट गमावल्या. मात्र, कर्णधार विराट कोहली आणि मोईन अली यांनी बंगळुरूचा डाव सावरला. त्यांनी चौथ्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी केली. त्यात मोईनचा वाटा होता ३२ धावांचा. त्याला संदीप लामिच्छानेने बाद केले. तो बाद झाल्यावर कोहलीने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ३३ चेंडूत ४१ धावा केल्यावर त्याला कागिसो रबाडाने माघारी पाठवले. पुढेही रबाडाने अप्रतिम गोलंदाजी केली. त्यामुळे बंगळुरूला २० षटकांत ८ विकेट गमावत १४९ धावाच करता आल्या.

रबाडाने २१ धावांत ४ विकेट घेतल्या. १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन खातेही न उघडता माघारी परतला. यानंतर अय्यर आणि पृथ्वी शॉ यांनी दुसर्‍या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. शॉने २८ धावा केल्या. पुढे अय्यरला कॉलिन इंग्राम (२२) आणि रिषभ पंत (१८) यांनी चांगली साथ दिली. मात्र, सामना जिंकण्यासाठी ५ धावांची गरज असताना अय्यरला नवदीप सैनीने बाद केले. त्याने ५० चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६७ धावा केल्या. त्यानंतर क्रिस मॉरिस (०) आणि पंतही बाद झाले. पण, अक्षर पटेल आणि तेवतीयाने उर्वरित धावा करत दिल्लीला विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक –

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ८ बाद १४९ (कोहली ४१, मोईन ३२; रबाडा ४/२१) पराभूत वि. दिल्ली कॅपिटल्स : १८.५ षटकांत ६ बाद १५२ (अय्यर ६७, शॉ २८; सैनी २/२४).