निवृत्तीच्या निर्णयाबाबत सचिनने केली धोनीची पाठराखण

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये भारताने चांगलाच मार खाल्ला. भारताने मालिका गमावली आणि त्याचे खापर सर्वांनी धोनीवर फोडले असून सर्वत्र धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. सध्या धोनी त्याच्या वाईट काळातून जात असताना माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने मात्र धोनीची पाठराखण केली आहे.

Sachin & Dhoni
सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी

सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा तीन वन डे सामन्यांच्या मालिकेमध्ये इंग्लंडने २-१ असा पराभव केला. ज्या दोन सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला त्या दोन्ही पराभवांचं खापर सध्या सर्वजण महेंद्रसिंग धोनीवर फोडत आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये भारताला धावांची आवश्यकता असताना धोनी खूपच धिम्या गतीने फलंदाजी करत होता. भारताचे महत्वाचे फलंदाज बाद झाले असल्याने फलंदाजीची मदार अनुभवी धोनीवर अवलंबून होती. अशा वेळी धोनीने संथ खेळी केल्यामुळे भारताने हातचे दोन सामने गमावले. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीची वेळ जवळ आली असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. धोनीवर टिकाकारांनी टिका करणे सुरु केले आहे. त्यामध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू लिटिल मास्टर सुनील गावस्कर आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेदेखील धोनीवर टिका करत निवृत्तीबाबत वाच्यता केली. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीची अधिकच चर्चा सुरु झाली आहे. परंतु भारतीय संघाचा माजी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मात्र अशा परिस्थितीत धोनीची पाठराखण केली आहे. धोनीच्या कठीण काळात सचिन धोनीच्या पाठी खंबीरपणे उभा राहिला आहे.

काय म्हणाला सचिन?

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सचिनला धोनीच्या निवृत्तीबाबत विचारणा केली. त्यावर सचिन म्हणाला की, ‘प्रत्येक खेळाडुला त्याचा फिटनेस माहित असतो. त्याची क्षमता माहित असते. आपण खेळपट्टीवर किती वेळ खेळू शकतो हेसुद्धा त्याला ठाऊक असते त्यामुळे निवृत्ती कधी घ्यायची, हा निर्णय त्या खेळाडूनेच घ्यावा’. असे बोलून धोनीवर टिका करणाऱ्यांना, धोनीला निवृत्तीचा सल्ला देणाऱ्यांना सचिनने चांगलीच चपराक लगावली आहे. सचिन पूढे म्हणाला की, आतापर्यंत धोनीने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत चांगले प्रदर्शन केले आहे. देशभरातील त्याचे चाहते, भारतीय संघाचे चाहते, भारतीय संघ, निवड समिती त्याच्याकडून काय अपेक्षा करते, हे धोनीला माहित आहे. त्यामुळे निवृत्तीचा निर्णय धोनीवर सोडायला हवा. असे बोलून सचिनने धोनीच्या निवृत्तीबाबत चर्चा करणाऱ्यांना हा प्रकार थांवण्याचा सल्ला दिला आहे.