सायना विजयी, सिंधू पराभूत

Saina Nehwal

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आठव्या सीडेड सायनाने थायलंडच्या पोर्नपावी चोचूवोन्गचा २१-७, २१-१८ असा पराभव केला. तिचा उपांत्य फेरीत चीनच्या हि बिंगजीओशी होईल. तर, पी.व्ही.सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांना मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. सिंधूला तिचा रिओ ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पराभव करणार्‍या कॅरोलिना मरीनने ११-२१, १२-२१ असे पराभूत केले. या सामन्यात सुरुवातीपासूनच मरीन अप्रतिम खेळ केला आणि सिंधूला हा सामना जिंकण्याची एकही संधी दिली नाही. पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतचा एशियाडमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीने १८-२१, १९-२१ असा पराभव केला. या सामन्याच्या पहिल्या गेममध्ये श्रीकांतकडे १७-१६ अशी आघाडी होती. पण, नंतर त्याला चांगला खेळ करता आला नाही. तर, दुसर्‍या गेममध्ये तो १८-१९ असा एकाच गुणाने मागे होता. मात्र, पुन्हा त्याचा खेळ खालावला आणि त्याने हा सामना गमावला.