सात्विक-चिराग उपांत्य फेरीत पराभूत

चीन ओपन बॅडमिंटन

भारताची पुरुष दुहेरीतील जोडी सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग चेट्टी यांना चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्यावर अव्वल सीडेड इंडोनेशियाच्या मार्कस फर्नाल्डी गिदोन आणि केविन संजया सुकमुल्जोने १६-२१, २०-२२ अशी मात केली. सात्विक-चिराग आणि मार्कस-केविन या दोन जोड्यांमध्ये आतापर्यंत ८ सामने झाले असून सर्व सामने इंडोनेशियाच्याच जोडीने जिंकले आहेत.

४० मिनिटे चाललेल्या या सामन्याचा पहिला गेम इंडोनेशियन जोडीने अगदी सहजरित्या जिंकला. परंतु, दुसर्‍या गेममध्ये सात्विक-चिरागने त्यांना चांगली झुंज दिली. या गेममध्ये सात्विक-चिरागला १८-१६ अशी आघाडी होती. मात्र, इंडोनेशियन जोडीने आपला खेळ उंचावत या गेममध्ये २०-२० अशी बरोबरी केली आणि पुढील २ गुण जिंकत हा सामना जिंकला.

मोमोटाला वर्षातील दहावे जेतेपद

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणार्‍या जपानच्या केंटो मोमोटाने चीन ओपनच्या पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले. हे मोमोटाचे या वर्षातील तब्बल दहावे जेतेपद होते. २५ वर्षीय मोमोटाने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चोऊ टीन-चेनला २१-१५, १७-२१, २१-१८ असे पराभूत केले. महिला एकेरीत चीनची चेन युफेई विजेती ठरली.