भारत-दक्षिण आफ्रिकेत दुसरा टी-20 सामना, खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी पोषक

कटकची खेळपट्टीही वेगवान गोलंदाजीसाठी पोषक समजली जाते. त्यामुळे यावेळी भारतीय संघ चार वेगवान गोलंदाजांनिशी उतरू शकतो. त्यामुळे या सामन्यात वेगवान गोलंदाज कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

second T20 match between India and South Africa
भारत-दक्षिण आफ्रिकेत दुसरा टी-20 सामना, खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी पोषक

भारतात रविवार ११ जून २०२२ रोजी होणारा दुसरा टी-२० सामना भारतीय संघासाठी महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना जिंकून भारतीय संघाला मालिकेत १-१ अशी बरोबरी करता येणार आहे. या दुसर्‍या टी-२० सामन्यात भारतीय संघात आता दोन बदल होऊ शकतात. दुसर्‍या टी-२० सामन्यासाठी अर्शदीप सिंह अथवा उमरान मलिक यांना भारतीय संघात पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर फिरकी गोलंदाजीमध्येही एक बदल होऊ शकतो आणि रवी बिश्नोई हा संघात येऊ शकतो. कटकची खेळपट्टीही वेगवान गोलंदाजीसाठी पोषक समजली जाते. त्यामुळे यावेळी भारतीय संघ चार वेगवान गोलंदाजांनिशी उतरू शकतो. त्यामुळे या सामन्यात वेगवान गोलंदाज कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी हर्षल पटेल याची गोलंदाजी फोडून काढली.

हर्षल पटेलच्या एका षटकात आफ्रिकेने 22 धावा वसूल केल्या होत्या. त्यामुळे हर्षल पटेलच्या जागी अर्शदीप सिंह अथवा उमरान मलिक यापैकी एकाला संधी मिळू शकते. अक्षर पटेल याच्या गोलंदाजीवरही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला होता. त्यामुळे अक्षर पटेलच्या जागी युवा रवी बिश्नोईला संधी मिळण्याची शक्यता आहे. डेथ ओव्हरमध्ये भारतीय गोलंदाजी कमकुवत जाणवत होती, अखेरच्या आठ षटकात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी तब्बल 110 धावा वसूल केल्या होत्या. त्यामुळे गोलंदाजीत बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भुवनेश्वर कुमार आणि आवेश खान यांची जागा निश्चित मानली जात आहे. पॉवरप्लेच्या षटकात भुवनेश्वर कुमारने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती. तर पहिल्या षटकात महागडा ठरणार्‍या आवेश खान याने अखेरच्या तीन षटकात टिचून मारा केला होता. अर्शदीप डेप्थ ओव्हरमध्ये चांगला पर्याय मानला जाऊ शकतो.

पहिल्या टी 20 सामन्यात फलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली होती. ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांनी दमदार सलामी दिली होती. त्यानंतर श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनीही प्रभावी फलंदाजी केली होती. त्यामुळे फलंदाजीत बदल होण्याची शक्यता कमीच आहे.


हेही वाचा : ग्रँडमास्टर प्रज्ञानंदने पटकावले नॉर्वे बुद्धिबळ खुल्या स्पर्धेचे विजेतेपद, व्ही प्रणीतचा पराभव