‘इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वर्ल्डकप २०१९ दरम्यान निवड समितीचे सदस्य भारतीय कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माला चहा सर्व्ह करत होते’, असं धक्कादायक विधान करून माजी भारतीय क्रिकेटपटू फारूख इंजिनिअर यांनी क्रिकेटविश्वात खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर तुफान प्रतिक्रिया उमटायला लागल्या होत्या. दरम्यान, त्यांच्या वक्तव्याचा अनुष्का शर्माने स्वत: समाचार घेतल्यानंतर आता बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी देखील फारूख इंजिनिअर यांची निर्भर्त्सना केली आहे. ‘फारूख यांनी किमान त्यांचं वय ओळखून तरी वागावं’, अशा शब्दांत एमएसके प्रसाद यांनी सुनावलं आहे.
८२ वर्षीय फारूख इंजिनिअर यांनी भारतासाठी ४६ कसोटी सामने खेळले आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी एमएसके प्रसाद अध्यक्ष असलेल्या निवड समितीवर टीका केली होती. ‘वर्ल्डकप सामन्यादरम्यान एक निवड समितीचा सदस्य अनुष्का शर्माला चहा सर्व्ह करत होता हे मी पाहिलं. त्याचं नाव मला माहीत नाही, पण तो निवड समितीचा सदस्य होता’, असं विधान इंजिनिअर यांनी केलं होतं. त्याचे तीव्र पडसाद समाज माध्यमांमध्ये पडू लागल्यानंतर खुद्द अनुष्का शर्मानेच त्यांना परखड शब्दांत सुनावलं होतं. ‘मी वर्ल्डकपमध्ये एकच सामना पाहिला. त्यातही मला कुणीही चहा सर्व्ह केला नाही. मी तर कॉफी प्यायले होते. आणि जर फारूख इंजिनिअर यांना निवड समितीवर टीका करायची असेल, तर त्यांनी खुशाल करावी. पण त्यासाठी माझ्या नावाचा वापर करू नये’, असं अनुष्का म्हणाली होती.
‘कर्णधाराच्या पत्नीचा अपमान’
यावर बोलताना एमएसके प्रसाद म्हणाले, ‘एखाद्याविषयी अशा स्तरावर जाऊन वक्तव्य करून त्यातून आनंद मिळवण्याच्या काहींच्या पद्धतीविषयी मला वाईट वाटतं. असं करून ते निवड समिती सदस्य आणि भारतीय कर्णधाराच्या पत्नीचा देखील अपमान करत आहेत. निवड समितीची नेमणूक बीसीसीआयने नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करून केली आहे हे कुणी विसरू नये. वयाच्या ८२व्या वर्षी त्यांनी वैचारिक प्रगल्भता दाखवावी आणि भारतीय क्रिकेटच्या यशाचा आनंद घ्यावा’, अशा खोचक शब्दांमध्ये प्रसाद यांनी फारूख इंजिनिअर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
अरे करु दे ना….! एक आदर म्हणून चहा सर्व्ह केला तर यांच्या बापाचे काय बिघडले? मोहन देवळे.