शाहबाज नदीमची विक्रमी कामगिरी; अवघ्या १० धावांत घेतल्या ८ विकेट

डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाज नदीमने स्थानिक एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्वविक्रमी कामगिरी केली. त्याने दोन दशकापासून असलेला स्थानिक एकदिवसीय क्रिकेटमधील रेकॉर्ड मोडीत काढला.

शाहबाज नदीमचा विश्वविक्रम (सौ-Cricinfo)

झारखंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाज नदीमने स्थानिक एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्वविक्रम केला. त्याने विजय हजारे चषकात झारखंडकडून खेळताना राजस्थानविरुद्ध १० षटकांत अवघ्या १० डावा देत ८ विकेट घेतल्या. त्यामुळे त्याने २ दशकांपासून असलेला विश्वविक्रम मोडीत काढला. याआधीचा रेकॉर्डही भारतीय गोलंदाजाच्या नावे होता. दिल्लीचा डावखुरा गोलंदाज राहुल सांघवीने १९९७-९८ मोसमात हिमाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात १५ धावा देत ८ विकेट घेतल्या होत्या.

विक्रमी कामगिरीत हॅट्रिकचाही समावेश

शाहबाज नदीमने राजस्थानविरुद्ध १० धावांत ८ विकेट घेतल्या. त्यामुळे स्थानिक क्रिकेटमध्ये (लिस्ट-ए क्रिकेट) त्याने विश्वविक्रम केला. या त्याच्या विश्वविक्रमी कामगिरीत हॅट्रिकचाही समावेश होता. त्याने या सामन्याच्या १९ व्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर महिपाल लोमरार आणि चेतन बिश्त यांना बाद केले. तर २१ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर नदीमने तेजिंदर सिंगला माघारी पाठवत आपली हॅट्रिक पूर्ण केली. तसेच त्याने राजस्थानचे पहिले आठ गडी बाद केले. राजस्थानच्या उर्वरित २ विकेट अनुकूल रॉयने घेतल्या. त्यामुळे राजस्थानला अवघ्या ७३ धावा करता आल्या. या धावा १४.३ षटकांत पूर्ण करत झारखंडने हा सामना जिंकला.

 

रेकॉर्डविषयी माहिती नव्हती

आपण विश्वविक्रम केला याची नदीमला सामना चालू असताना कल्पना नव्हती, “सामना चालू असताना मला विक्रमाची कल्पना नव्हती. सामना संपल्यानंतर मला काही लोकांनी विक्रम झाल्याचे सांगितले. विक्रम केल्याचा खूप आनंद आहे. मी फक्त योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्यावर भर देत होतो. त्यामुळेच मला विकेट मिळाल्या.”