कोहली आणि नवीनच्या राड्यात पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची उडी, वाद वाढण्याची शक्यता?

आयपीएलमधील लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याचे अनेक घडामोडी समोर येत आहेत. विराट कोहली, नवीन-उल-हक आणि गौतम गंभीर हे तीन खेळाडू वादाच्या केंद्रस्थानी होते. परंतु कोहली आणि नवीनच्या राड्यात पाकिस्तानच्या माजी कर्णधारने उडी मारली असून त्याने अफगाणिस्तानच्या खेळाडूचं समर्थन केलं आहे.

अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन हा फलंदाजी करत असताना मोहम्मद सिराजची गोलंदाजी सुरू होती. तेव्हा विराट आणि त्याच्यात काहीतरी बिनसले. त्यानंतर विराट कोहलीने या प्रकाराबाबत ट्वीट देखील केले होते. विराट आणि नवीनच्या राड्यात अमित मिश्राने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु कोहली थांबला नाही आणि सतत काहीतरी बोलत होता. सामना संपल्यानंतर कोहली आणि नवीन समोर आले तेव्हा सुरूवातीला दोघांनी हस्तांदोलन केले. पण येथेही दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर नवीनने कोहलीचा हात झटकला. दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने नवीनच्या कृत्याचे समर्थन केले आहे.

नवीन तेव्हाच प्रतिक्रिया देतो, जेव्हा कोणी त्याला विनाकारण डिवचतो. मी त्याला अनेकदा गोलंदाजी करताना पाहिले आहे. त्याला फटकारले देखील जाते. पण त्याने कधीही कोणाशी भांडण करण्याचा प्रयत्न केला नाही. मी त्याला इतका होताना कधी पाहिलं असेल तर मला आठवत नाही, असं शाहिद आफ्रिदी म्हणाला.

वादाला सुरूवात कुठून झाली

लखनऊ जायंट्स संघाच्या डावातील 17व्या षटकात विराट स्टंपच्या मागून धावत आला आणि त्याने नवीनला काहीतरी इशारा केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली. त्यावर नवीन त्याच्या जवळ आला वाद घालू लागला. या वादादरम्यान विराटने आपल्या बुटाकडे बोट दाखवत इशारा केला. त्यानंतर वाद वाढू लागल्यानंतर बाकीच्या खेळाडूंनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता विराट आणि अमित मिश्रा यांच्यातही वाद झाला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू हस्तांदोलन करत असताना विराट नवीनला काहीतरी बोलला. नवीनने विराटला उत्तर दिले आणि विराटनेही त्याला पुन्हा उत्तर दिल्यामुळे नवीन विराटच्या दिशेने वळला.

दरम्यान, ग्लेन मॅक्सवेलने नवीनला दूर केल्यानंतर विराट सीमारेषेच्या दिशेने निघून गेला. यावेळी मेयर्स कोहलीजवळ आला आणि त्याला काहीतरी बोलू लागला. तेव्हा गंभीरने मेयर्सला ओढत बाजूला केले. यानंतर विराट डुप्लेसीशी बोलू लागला आणि गंभीरशी लांबूनच हातवारे करत काहीतरी बोलत होता. त्याच्या बोलण्याला गंभीरही उत्तर देत होता. मात्र यावेळी गंभीरचा पारा चढलेला होता. त्याला केएल राहुलने शांत करण्याचा प्रयत्न केला. पण याचवेळी विराट गंभीरकडे गेला आणि वाद घालू लागला. प्रकरण वाढत असल्याचे पाहिल्यावर दोन्ही संघांचे सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंनी विराट आणि गंभीरला वेगळे केल्यानंतर प्रकरण शांत केले. यानंतर विराट आणि लोकेश राहुल यांच्यात दीर्घ संवादही पाहायला मिळाला.


हेही वाचा : मी दोघांमध्ये मैत्री करायला तयार; विराट-गंभीर वादावर रवी शास्त्रींनी दिली प्रतिक्रिया