बांगलादेश संघाला मिळाला नवा कसोटी कर्णधार, पण रेकॉर्डमध्ये ठरलाय फ्लॉप; कोण आहे हा खेळाडू?

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) पुन्हा एकदा कसोटी संघाचे कर्णधारपद शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) यांच्याकडे सोपवले आहे. ३१ मे रोजी कर्णधारपदाचा राजीनामा देणाऱ्या मोमिनुल हकच्या (Mominul Haq) जागी शाकीब अल हसनेची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कारण ३१ मे रोजी बांगलादेशचा माजी कर्णधार हकने राजीनामा दिला होता. शाकीबने आता कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. या व्यतिरिक्त बोर्डाने लिटन दासला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवलं आहे.

बीसीबीचं मोठं वक्तव्य

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हक यांनी सांगितलं की, माझी शाकीबसोबत चर्चा झाली आहे. त्यामुळे तो खेळण्यासाठी आणि क्रिकेटची संपूर्ण धुरा सांभाळण्यासाठी तयार आहे. वेस्ट इंडिजच्या मालिकेनंतर बांगलादेश झिम्बाब्वेसोबत खेळण्यास मैदानात उतरणार आहे. परंतु शाकिब या मालिकांमध्ये खेळणार की नाही, याबाबत अद्यापही कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाहीये. तसेच शाकिब किती दिवसांपर्यंत बांगलादेशचा कर्णधार राहणार आहे, हे सुद्धा अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये.

नजमुल यांनी पुढे सांगितलं की, माझ्याजवळ तीन नावं होती. ज्या लोकांनी कर्णधारची निवड केली त्यांनी एक बैठक घेतली आणि मला तीन नावे दिली. त्यामध्ये एकाची कर्णधार आणि दुसऱ्याची उपकर्णधार म्हणून निवड करायची होती. शाकिबने कर्णधारपद नाकारले असते तर आम्ही इतर दोन खेळाडूंचा विचार केला असता. आम्हाला नवीन कर्णधार आणि उपकर्णधार दोघांची नियुक्ती करायची होती. त्यामुळे सुरूवातीच्या चर्चेनंतर आम्ही शाकिब अल हसनला कर्णधार आणि लिटन दासला उपकर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

…पण रेकार्डमध्ये ठरलाय फ्लॉप

२००९ मध्ये वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्यात ३५ वर्षीय शाकिबने पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवले होते. त्यानंतर २०१० मध्ये आणखी सहा सामन्यांसाठी संघाचे नेतृत्व स्वीकारले होते. ऑगस्ट २०११ मध्ये झिम्बाब्वेविरूद्ध त्याने संघाचे नेतृत्व केले आहे. त्यानंतर डिसेंबर २०१७ मध्ये मुशफिकुर रहीमच्या जागी शाकिबने पुन्हा एकदा बांगलादेशचे कसोटी कर्णधारपद स्वीकारले होते. पण २०१९ मध्ये फिक्सिंग प्रकरणात बंदी आल्याने त्याला कर्णधारपद गमवावे लागले होते. शाकिबने एकूण १४ कसोटी सामन्यांमध्ये बांगलादेशचे कर्णधारपद भूषवले आहे, ज्यामध्ये संघाने तीन सामने जिंकले आहेत. तर ११ सामने गमावले आहेत.


हेही वाचा : “तू आता कर्णधार नाहीस त्यामुळे…”;हार्दिक पांड्याला विराटच्या प्रशिक्षकांकडून इशारा