Thursday, February 18, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा शरद पवारांचा क्रिकेटच्या मैदानात भाजपला दे धक्का! 

शरद पवारांचा क्रिकेटच्या मैदानात भाजपला दे धक्का! 

एमसीएच्या सचिवपदी असणाऱ्या संजय नाईक यांना त्रिसदस्यीय समितीच्या चौकशीला सामोरे जाण्याची योजना बनवली आहे.

Related Story

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकार स्थिरस्थावर झाल्यानंतर शरद पवारांनी आता क्रिकेटच्या मैदानावरही भाजपविरुद्ध धक्का तंत्राला सुरुवात केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) सचिवपदी असणार्‍या संजय नाईक यांना त्रिसदस्यीय समितीच्या चौकशीला सामोरे जाण्याची योजना बनवली आहे. घटनाविरोधी कारभार करणे, क्रिकेट सुधार समितीच्या (सीआयसी) अधिकारांवर गदा आणून मनमानी करणे आणि आर्थिक समिती न नेमता खर्च करणे असे गंभीर आरोप नाईक यांच्यावर ६० क्लबच्या सदस्यांनी ठेवले आहेत. संजय नाईक हे भाजपचे नेते अ‍ॅड. आशिष शेलार यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. नाईकांविरुद्ध त्रिसदस्यीय समिती नेमण्यासाठी विशेष बैठकीची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी हा भाजपला पवारांकडून धक्का देण्याचा प्रयत्न आहे.

शरद पवार यांनी २० वर्षांपूर्वी क्रिकेटपटूंच्या सीआयसीची निर्मिती केली होती. प्रशासकीय कारभाराव्यतिरिक्त क्रिकेटमध्ये सुधारणा करणे हे प्रमुख काम या समितीवर असलेले प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंचे मंडळ करत असते. नाईक यांनी या क्रिकेटपटूंचे आणि पर्यायाने समितीचे अधिकार स्वतःच्या हाती घेऊन मनमानी सुरु केली होती. त्याचप्रमाणे आर्थिक समिती न नेमता संघटनेचे खर्च अपारदर्शक पद्धतीने नाईक करण्याची चूकही नाईक यांनी केली. तसेच अनेक घटनाविरोधी निर्णय नाईक यांनी ठेवल्याचा ठपका ३३३ क्लबपैकी ६० क्लबनी ठेवला आहे. १९९८ नंतर सचिवपदी काम करणार्‍या व्यक्तीवर अशाप्रकारचा ठपका ठेवून चौकशीला सामोरे जावे लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. याच संजय नाईक यांच्याविरोधात रवी मांद्रेकर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामध्येदेखील याचप्रकारचे दोषारोप ठेवण्यात आले आहेत.

- Advertisement -

२००० साली पवार यांनी मुंबई क्रिकेटमध्ये पदार्पण करताच क्रिकेटच्या विकासासाठी क्रिकेट सुधार समितीची स्थापना केली होती. ज्येष्ठ क्रिकेटपटू माधव आपटे यांना सीआयसीचे पहिले अध्यक्ष करण्यात आले होते. या समितीवर कटाक्षाने प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंचीच निवड केली जाते. मुंबई क्रिकेटच्या सकारात्मक विकासासाठी ही समिती काम करते. मात्र, संजय नाईक यांनी या समितीच्या कार्यकक्षा गोठवून सर्व अधिकार स्वतःच्या हाती घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

संजय नाईक हे भाजप नेते आणि एमसीएचे माजी अध्यक्ष आशिष शेलार यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. शेलार यांच्याच आशिर्वादाने आणि सल्ल्याने नाईक एमसीएतील मनमानी करत असतात. याच्या वाढत्या तक्रारी अनेक सदस्यांनी पवार यांच्याकडे भेटून केल्या होत्या. मात्र, परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याने ६० क्लबनी एकत्र येत विशेष सभेची मागणी केली आहे. या मागणीनुसार त्रिसदस्यीय समितीची स्थापना करून नाईक यांना या सगळ्या अनागोंदी कारभाराबद्दल चौकशीला सामोरे जाणे भाग पाडावे आणि सीआयसीच्या कारभारात ढवळाढवळ न करता मुंबई क्रिकेटचा कारभार चालावा अशा स्वरूपाची मागणी करण्यात आली आहे. नाईक यांचे अधिकार ही चौकशी सुरु असेपर्यंत ते सहसचिव यांच्याकडे देण्यात यावेत अशीही या सदस्यांची मागणी आहे.

- Advertisement -

या विशेष बैठकीच्या अभियानाला शरद पवार यांनीही आशीर्वाद दिल्याचे मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात बोलले जात आहे. नाईक या चौकशीच्या फेर्‍यात अडकले आणि पदच्युत झाले, तर आशिष शेलार पर्यायाने भाजपच्या नेत्यांना हा धक्का बसू शकतो असे म्हटले जात आहे. आगामी निवडणुकीच्या आधी पवारांच्या बरोबरच आपल्या नावाने गट संयुक्तरित्या ओळखला जावा अशी आशिष शेलार यांची योजना होती. या संपूर्ण योजनेलाच पवारांनी कात्रजचा घाट दाखवला आहे.

- Advertisement -