रूट मोबाईलच्या विजयात शशिकांत कदम चमकला.

ठाणे : शशिकांत कदमच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर रूट मोबाईल संघाने डब्ल्यू एन एस ग्लोबल संघाचा ४२ धावांनी पराभव करत ४६ व्या ठाणेवैभव करंडक आंतरकार्यालयीन टी २० क्रिकेट स्पर्धेत ब गटाचे विजेतेपद संपादन केले.सेंट्रल मैदानावर खेळवण्यात आलेल्या अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना शशिकांत कदमने ३७ चेंडूत दोन चौकार आणि आठ षटकार ठोकत नाबाद ७७ धावांची खेळी करत संघाला २० षटकात ७ बाद १८४ धावसंख्या उभारुन दिली. वेदांत मुरकरने तिन चौकारासह ३१ धावा केल्या. अथर्व डाकवे आणि राहुल किरोडियनने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. तर हर्ष मिश्रा, शिवम जैस्वाल आणि वेदप्रकाश जैस्वालने प्रत्येकी एक विकेट मिळवली.

त्यानंतर शशिकांत कदम, विशाल नागावकर आणि संकेत पांडयेने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत डब्ल्यू एन एस संघाला १९.५ षटकात १४२ धावांवर रोखले. शशिकांतने ३६ धावांत तिघा फलंदाजांना माघारी पाठवले. विशाल आणि संकेतने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. रवींदर सोळंकी, अजिंक्य बेलोसे आणि पियुष सोनीच्या खात्यात प्रत्येकी एक विकेट जमा झाली.