घरक्रीडाश्रीलंका दौऱ्यात 'हा' माजी कर्णधार भूषवणार भारताचे प्रशिक्षकपद? धवन नेतृत्व करण्याची शक्यता 

श्रीलंका दौऱ्यात ‘हा’ माजी कर्णधार भूषवणार भारताचे प्रशिक्षकपद? धवन नेतृत्व करण्याची शक्यता 

Subscribe

कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौऱ्यात अनुभवी सलामीवीर शिखर धवन भारतीय संघाचे नेतृत्व करू शकेल.

भारतीय संघ जुलैमध्ये श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. परंतु, याच काळात भारताचा संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिकाही खेळणार आहे. त्यामुळे कसोटी मालिकेत खेळणारे आघाडीचे भारतीय खेळाडू श्रीलंका दौऱ्याला मुकणार आहेत. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौऱ्यात अनुभवी सलामीवीर शिखर धवन भारतीय संघाचे नेतृत्व करू शकेल. भारतीय संघ श्रीलंकेत तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार असून या मालिकेला १३ जुलैपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारताचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष राहुल द्रविड भारताचे प्रशिक्षकपद भूषवण्याची शक्यता आहे.

सॅमसन, किशन या यष्टिरक्षकांना संधी?

श्रीलंकेतील दोन्ही मालिकांसाठी धवनसह पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल या सलामीवीरांना संधी मिळू शकेल. तसेच रिषभ पंत आणि लोकेश राहुल यांची इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाल्याने श्रीलंकेविरुद्ध ईशान किशन व संजू सॅमसन हे यष्टिरक्षणाची धुरा सांभाळतील. तसेच धवनची कर्णधारपदी निवड होण्याची शक्यता आहे. धवनला याआधी भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव नसला तरी त्याने रणजी करंडकात दिल्लीचे नेतृत्व केले आहे. तसेच त्याच्या गाठीशी ३४ कसोटी, १४२ एकदिवसीय आणि ६५ टी-२० अनुभव आहे.

- Advertisement -

राहुल द्रविड प्रशिक्षकपदी?

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार असल्याने मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना श्रीलंका दौऱ्यावर जाता येणार नाही. त्यांच्या अनुपस्थितीत राहुल द्रविड भारताचे प्रशिक्षकपद भूषवण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील अन्य काही प्रशिक्षक द्रविडसोबत श्रीलंकेला जाऊ शकतील. द्रविडने याआधी भारत ‘अ’ आणि भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे, तसेच आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षकपद भूषवले आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -