घरक्रीडाछत्रपती मंडळ, श्री समर्थची आगेकूच

छत्रपती मंडळ, श्री समर्थची आगेकूच

Subscribe

शिवनेरी सेवा मंडळ खो-खो स्पर्धेच्या महिला राज्यस्तरीय गटात छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ आणि दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिराने आगेकूच केली आहे. पुरुष व्यावसायिक गटात नेव्हल डॉक्स आणि डी. डी.ऍडव्हटायसिन्ग या संघांनीही आपापले सामने जिंकले.

उस्मानाबादच्या छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळाने पुण्याच्या नरसिंह क्रीडा मंडळाचा १५-१० असा पराभव केला. छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळातर्फे निकिता पवार (२:४०, ३:४० मि. संरक्षण आणि २ गडी), संपदा मोरे (१:५०, २:०० मि. संरक्षण आणि १ गडी) यांनी चांगला खेळ केला. दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिराने सरस्वती कन्या संघाचा ०५-०४ असा एक गुण व सात मिनिटे राखून पराभव केला. श्री समर्थ व्यायाम मंदिरकडून साजल पाटील (४:२०, ४:१० मि. संरक्षण आणि १ गडी), भक्ती धांगडे (१:५०, १:४० मि. संरक्षण आणि ३ गडी), अनुष्का प्रभू (२:५०, ३:१० मि. संरक्षण) यांनी अप्रतिम खेळ केला, तसेच ठाण्याचा रा. फ. नाईक विद्यालयाने परांजपे स्पोर्ट्स क्लबवर १०-०५ अशी एक डाव व पाच गुणांनी मात केली. रत्नागिरीच्या आर्यन स्पोर्ट्स क्लबने साखरवाडी क्रीडा मंडळ, सातारा संघाचा १०-०६ असा पराभव केला.

- Advertisement -

पुरुष व्यावसायिक गटात नेव्हल डॉक्सने धनी टुरिझम या संघाचा १५-०९ असा पराभव केला. नेव्हलकडून आदेश कागडा (१:००, १:५० मि. संरक्षण आणि ४ गडी), किरण कर्णवार (२:५० मि. संरक्षण आणि ३ गडी) यांनी चांगला खेळ केला. त्यांना अभिषेक कागडा आणि संकेत सावंत यांनी प्रत्येकी १:२० मिनिटे संरक्षण करत आणि आक्रमणात प्रत्येकी दोन गडी बाद करत चांगली साथ दिली, तसेच डी. डी.ऍडव्हटायसिन्गने माझगाव डॉक्सला ०६-०५ असे पराभूत केले. डी. डी.कडून शुभम शिगवण (४:१०, १:४० मि.) आणि प्रसाद पताडे (२:१०, २:३० मि.) यांनी संरक्षणात, तर आदित्य टेमकर आणि रोहित जावळे (प्रत्येकी दोन गडी) यांनी आक्रमणात चांगला खेळ केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -