अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ, आमदार संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्यावतीने अहिल्यानगर येथील स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीत मागील चार दिवसांपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माती विभागातील अंतिम सामना सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात झाला. या सामन्यात महेंद्र गायकवाड याने साकेत यादवचा पराभव केला. यानंतर गादी विभागातील अंतिम लढत नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात पार पडली. यावेळी पृथ्वीराज मोहोळ याने शिवराज राक्षे यांचा पराभव केला. मात्र पराभव मान्य नसल्याचे म्हणत शिवराज राक्षेने नाराजी व्यक्त केली. यानंतर त्याने पंचांची कॉलर पकडत लाथ मारल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे स्पर्धेदरम्यान गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. (Shivraj Rakshe kicked the umpire after losing in Maharashtra wrestling tournament)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धा पार पडली. गादी विभागातील अंतिम लढतीतील सामना शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अटीतटीचा झाल्याचे पाहायला मिळाले. पृथ्वीराज मोहोळ याच्या एका डावात शिवराज राक्षे हा पाठीवर आला. यावेळी पंचांनी शिवराज राक्षेला बाद केले. मात्र पंचांनी चुकीच्या पद्धतीने पराभूत केल्याचे म्हणत शिवराज राक्षेने नाराजी व्यक्त केली. माझी पाठ टेकलीच नाही, असे म्हणत त्याने रिव्ह्यू मागितला. मात्र तोपर्यंत पृथ्वीराज मोहोळ याला विजयी करण्यात आले होते. त्यामुळे दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापटही झाल्याचे दिसून आले. या गोंधळानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला.
हेही वाचा – U-19 Womens World Cup : भारतीय पोरींची कमाल, दुसऱ्यांदा कोरले विश्वचषकावर नाव
शिवराज राक्षे पराभूत झाल्यानंतर काका पवार यांच्यासह इतर पैलवानांनी पंचांच्या निर्णयावर आक्षेप नोंदावला. या सर्वांनी थेट पंचांना जाऊन जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी राग अनावर झालेल्या शिवराज राक्षे याने पंचांची कॉलर पकडली आणि त्यानंतर लाथ मारली. सदर दृश्य कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाले आहे. यानंतर पोलिसांना पुन्हा एकदा मध्यस्थी करावी लागली. यानंतर हे दोन्ही मल्ल व्यासपीठावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गेले. तिथे जाऊन दोघांनी आपली बाजू मांडली. शिवराज राक्षे याने अजित पवारांकडेही सामन्याचा रिव्ह्यू बघण्याची विनंती केली. यानंतर आर्मीचे जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्व पैलवानांना खाली उतरवले. तसेच शिवराज राक्षेला तंबी देत त्याला मैदानातून बाहेर काढण्यात आले.
कोण आहे शिवराज राक्षे?
दरम्यान, पैलवान शिवराज राक्षे हा मुळचा पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमधील राक्षेवाडीचा रहिवासी आहे. आजोबा आणि वडील पैलवान असल्यामुळे त्याला कुस्तीचं बाळकडू घरातूनच मिळालं आहे. त्यामुले कुस्तीचा वारसा सध्या शिवराज राक्षे पुढे चालवत आहे. महत्त्वाचे म्हणजे शिवराज राक्षे याने याआधी दोनवेळा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पटकवला आहे. यावेळी त्याला तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्याची संधी होती.