बंड्या मारुती, जय भारत उपांत्य फेरीत

शिवशंकर चषक कबड्डी स्पर्धा

शिवशंकर उत्सव मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धा श्रमिक जिमखाना, ना. म. जोशी मार्ग, मुंबई येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेत डिलाईल रोड परिसरातील तीन संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केल्याने प्रेक्षकांमध्ये मोठा जोश निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. बंड्या मारुती सेवा मंडळ वि. मोरया संघ भिवंडी व गुड मॉर्निंग संघ वि. जय भारत सेवा मंडळ उपांत्य फेरीत लढत देणार आहेत.

आज झालेल्या सामन्यात मुंबई शहरच्या बंड्या मारुती सेवा मंडळाने मुंबई उपनगरच्या स्वास्तिकचा 32-27 असा 5 गुणांनी धुव्वा उडवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. बंड्या मारुतीच्या विनोद आत्याळकरने व स्वास्तिकच्या आकाशने जोरदार खेळ केला. मुंबई शहरच्याच जय भारत सेवा मंडळाने विजय नवनाथचा 34-18 असा 16 गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात जय भारतच्या सिद्धेश सावंतने एका चढाईत तीन गुण मिळवत या सामन्यावर पकड मिळवली.

भिवंडीच्या मोरया मंडळाने मुंबई उपनगरच्या केदारनाथचा 25-20 असा 05 गुणांनी विजय संपादन केला. मोरयाच्या परेश हरळ व चैतन्य माळी तर केदारनाथच्या ओमकारनाथ कदम व चेतन कदम यांनी चढाई व पकड करताना प्रेक्षकांची शाबासकी मिळवली. मुंबई शहरच्या गुड मॉर्निंग संघाने मुंबई उपनगरच्या उजाला संघाचा 33-27 असा 6 गुणांनी पराभव केला. गुड मॉर्निंगच्या धिरज रोकडे, अक्षय भोईर व तहा शेख यांनी तर उजालाच्या सुमित पाटील व अजय शिंदे यांनी बहारदार केलेल्या खेळाच्या जोरावर सामन्यात रंगत भरली होती.