ICC Champions Trophy : भारतीय संघाने 12 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपविला. रविवारी ( 9 मार्च ) झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा चार गड्यांनी पराभव करीत तिसऱ्यांदा विजेता करंडक उंचावला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वात नऊ महिन्यांत भारताचे हे दुसरे ‘आयसीसी’ जेतेपद आहे. 29 जून 2024 ला भारतीय संघाने ‘आयसीसी टी-20’ विश्वचषक जिंकला होता. भारताच्या विजयानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने प्रतिक्रिया दिली आहे.
रोहितनेही चांगली फलंदाजी केली
शोएब अख्तर म्हणाला, “गेल्या 10 वर्षात भारत आयसीसी टूर्नामेंटमधील सर्वोत्तम संघ बनला आहे. भारतीय संघाने गेल्या वर्षीही विश्वचषक जिंकला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने दिमाखदार कामगिरी केली आहे. वरूण चक्रवर्ती आणि विराटने उत्तम कामगिरी केली. अंतिम सामन्यात रोहितनेही चांगली फलंदाजी केली. भारताचे खूप-खूप अभिनंदन.. भारत चॅम्पियन्स ट्रॉफीला पात्र होता.”
भारतीय संघ जिंकला चांगले वाटले
“भारतीय संघ सर्वोकृष्ट संघापैकी एक होता. 10 वर्षात भारतीय संघ सर्वोकृष्ट संघ म्हणून समोर आला आहे. संघातील सर्वांनी चांगली कामगिरी केली. भारतीय संघ जिंकला फार चांगले वाटले. तुमचे खूप-खूप अभिनंदन,” असे शोएब अख्तरने म्हटले आहे.
भारतीय संघाला किती पैसे बक्षीस म्हणून मिळणार?
2002 आणि 2013 नंतर भारतीय संघाने 2025 तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या विजयासह भारतीय संघाला आयसीसीकडून 2.24 दशलक्ष डॉलर्स ( सुमारे 20 कोटी रूपये ) बक्षीस रक्कम मिळाली. उपविजेत्या न्यूझीलंड संघाला 9.72 कोटी रूपये मिळाले. चॅम्पिनन्स ट्रॉफीमध्ये केवळ विजेता आणि उपविजेता संघच नाही, तर अन्य संघांना सुद्धा चांगले बक्षीस मिळाले आहे. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना – ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका – प्रत्येकी 4.86 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली.