IPL 2020 : कर्णधार श्रेयस अय्यरचे कौतुक करावे तेवढे कमीच – रबाडा 

श्रेयसच्या नेतृत्वात दिल्लीने यंदा अप्रतिम कामगिरी केली आहे.

shreyas iyer

श्रेयस अय्यरने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत ३३५ धावा केल्या असून दिल्ली कॅपिटल्स संघाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, दिल्लीचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला यंदा फलंदाज श्रेयसपेक्षा, कर्णधार श्रेयसने जास्त प्रभावित केले आहे. दिल्लीच्या संघाला यंदा आयपीएल स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. श्रेयसच्या नेतृत्वात दिल्लीने यंदा अप्रतिम कामगिरी केली असून १० पैकी ७ सामने जिंकले आहेत. श्रेयसने ड्रेसिंग रूममध्ये चांगले वातावरण ठेवले आहे आणि त्यामुळेच दिल्लीचा संघ यशस्वी होत आहे, असे रबाडाला वाटते.

दबाव योग्य पद्धतीने हाताळला

कर्णधार म्हणून श्रेयसचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. तो खूप युवा आहे. कर्णधार म्हणून, तुम्ही जेव्हा खासकरून मोठ्या स्पर्धेत परदेशी खेळाडूंचे नेतृत्व करत असता, तेव्हा तुमच्यावर खूप दबाव असतो. मात्र, त्याने हा दबाव अगदी योग्य पद्धतीने हाताळला आहे. तसेच तो स्वतः चांगली कामगिरी करून इतर खेळाडूंसमोर आदर्श ठेवतो. तो कोणत्याही गोष्टीचा फार विचार करत नाही. मैदानात उतरल्यावर तो आमचा कर्णधार म्हणून योग्य ते निर्णय घेतो. प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगचीही त्याला मदत होत आहे. दिल्ली संघात खेळीमेळीचे वातावरण आहे. त्यामुळेच आमचा संघ बहुतेक इतका यशस्वी होत आहे, असे रबाडाने सांगितले.

तुषार देशपांडेची पाठराखण

दिल्लीचा मागील सामना पंजाबविरुद्ध झाला. या सामन्यात युवा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने २ षटकांतच ४१ धावा दिल्या होत्या. मात्र, रबाडाने त्याची पाठराखण केली आहे. तुषार चांगली गोलंदाजी करत आहे. मात्र, तो बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. त्याने पंजाबविरुद्ध वाईट गोलंदाजी केली नाही. त्याने त्याच्या गोलंदाजीत केवळ थोडे बदल केले पाहिजेत. त्याने अनुभवातून शिकले पाहिजे, असेही रबाडा म्हणाला.