IPL 2020 : दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत!

दिल्लीच्या बऱ्याच खेळाडूंना दुखापतींनी सतावले आहे.

Shreyas Iyer
श्रेयस अय्यर

दिल्ली कॅपिटल्सला यंदा आयपीएल स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्यांनी आतापर्यंतच्या स्पर्धेत अप्रतिम खेळ करत आठ पैकी सहा सामने जिंकले आहेत. त्यामुळे हा संघ गुणतक्त्यात अव्वल स्थानावर आहे. मात्र, असे असले तरी दिल्लीसाठी एक चिंतेचा विषय म्हणजे त्यांच्या बऱ्याच खेळाडूंना दुखापतींनी सतावले आहे. अमित मिश्रा आणि ईशांत शर्मा हे अनुभवी गोलंदाज दुखापतीमुळे आधीच स्पर्धेबाहेर झाले आहेत. त्यांचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतलाही दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला काही सामन्यांना मुकावे लागले आहे. आता त्यांचा कर्णधार श्रेयस अय्यरही दुखापतग्रस्त झाला आहे.

खांद्याची हालचाल करू शकतोय

बुधवारी आयपीएलमध्ये दिल्ली विरुद्ध राजस्थान सामना पार पडला. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना १६१ धावा केल्या, ज्यात कर्णधार अय्यरने ५३ धावांचे योगदान दिले. त्यानंतर राजस्थानच्या डावात चेंडू अडवण्यासाठी म्हणून अय्यरने सूर मारला आणि त्यावेळीच त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदानाबाहेरही जावे लागले. त्याच्या अनुपस्थितीत उर्वरित सामन्यात शिखर धवनने दिल्लीचे नेतृत्व केले. ‘अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली आहे. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे तो खांद्याची हालचाल करू शकत आहे. मी अजून त्याच्याशी चर्चा केलेली नाही. आम्हाला त्याची दुखापत किती गंभीर आहे, हे उद्या कळू शकेल,’ असे सामन्यानंतर धवनने सांगितले.