ICC T20 Rankings: टी-२० रँकिंगमध्ये श्रेयस अय्यरने गाठलं १८वं स्थान, विराटला मोठा धक्का

भारताचा वेगवान फलंदाज श्रेयस अय्यरने आयसीसी टी-२० क्रमवारीत १८व्या स्थानावर झेप घेतली आहे. श्रीलंकेविरुद्ध सलग तीन अर्धशतके झळकावणारा श्रेयस अय्यर २७ व्या स्थानावरून १८व्या स्थानावर पोहोचला आहे. परंतु भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली टॉप-१० मधून बाहेर पडला आहे. श्रीलंकेविरूद्ध भारताने टी-२० मालिकेत ३-० असा क्लीन स्वीप केला होता. परंतु या विजयामध्ये काही खेळांडूंच्या क्रमावारीवर मोठा फायदा झाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १७४ च्या स्ट्राइक रेटने २०४ धावा केल्या. यावेळी अय्यर तिन्ही सामन्यांत नाबाद राहिला होता.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला आयसीसी फलंदाजी क्रमवारीत मोठा धक्का बसला आहे. टॉप-१० रँकिंगमधून तो बाहेर पडला आहे. इतकेच नाही तर कोहली १० व्या स्थानावरून थेट १५ व्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या ३ सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीचा सहभागी नव्हता. त्यामुळे त्याला टॉप-१० मधूनही बाहेर पडावे लागले.

कर्णधार रोहित शर्मा १३ व्या क्रमांकावर आहे. भारतीय फलंदाजांमध्ये केएल राहुल हा टॉप-१० मध्ये आहे. तो दहाव्या स्थानावर आहेत. टी-२० च्या टॉप-१० मध्ये एकाही भारतीय गोलंदाजाचा समावेश नाहीये. दरम्यान, पाकिस्तानचा क्रिकेटपटू बाबर आझम टी-२० फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम आहे. श्रीलंकेचा पाथुम निसांका अव्वल १० मध्ये सहा स्थानांनी प्रगती करत नवव्या स्थानावर पोहोचला आहे.

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारा प्रथमच टॉप-४० गोलंदाजांमध्ये सामील झाला आहे. यजमान न्यूझीलंडविरुद्ध चांगल्या कामगिरीनंतर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने कसोटी क्रमवारीत सर्वात मोठी झेप घेतली असून, त्याने तीन स्थानांची झेप घेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रबाडाने २ सामन्यांच्या मालिकेत १० विकेटस घेतल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅबुशेन कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. एकदिवसीय क्रमवारीत, अफगाणिस्तानचा अनुभवी फिरकीपटू गोलंदाज राशीद खानने बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेनंतर टॉप-१० गोलंदाजांच्या यादीत आपले स्थान पुन्हा मिळवले आहे. बांगलादेशचा मेहदी हसन मिराज ७व्या स्थानावर घसरला आहे.


हेही वाचा : IND vs SL: कोहलीला १०० व्या कसोटीत इतिहास रचण्याची संधी, केवळ ३८ धावांची गरज