घरक्रीडाश्रेयस अय्यरचे विक्रमी शतक, मुंबईचा विजय

श्रेयस अय्यरचे विक्रमी शतक, मुंबईचा विजय

Subscribe

सय्यद मुश्ताक अली करंडक

श्रेयस अय्यरने केलेल्या झंझावाती शतकाच्या जोरावर मुंबईने सिक्कीमचा १५४ धावांनी पराभव करत सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० स्पर्धेची विजयी सुरुवात केली. अय्यरने या सामन्यात अवघ्या ५५ चेंडूंत ७ चौकार आणि १५ षटकार ठोकत १४७ धावा केल्या. ही भारतीय फलंदाजाने टी-२० सामन्यात केलेली सर्वोत्तम खेळी आहे. याआधी हा विक्रम रिषभ पंतच्या नावे होता. त्याने आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळताना नाबाद १२८ धावा केल्या होत्या.

सय्यद मुश्ताक अली करंडकाच्या पहिल्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार अजिंक्य रहाणे ११ धावांवर बाद झाला, तर दुखापतीमुळे तीन महिने मैदानाबाहेर रहावे लागलेल्या पृथ्वी शॉला पुनरागमनात १० धावाच करता आल्या. त्यामुळे मुंबईची २ बाद २२ अशी अवस्था होती. यानंतर मात्र श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादवने अप्रतिम फलंदाजी केली. या दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी २१२ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने ३३ चेंडूंत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६३ धावा केल्या, तर अय्यरने १४७ धावा केल्या. त्याने अवघ्या ३८ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. या दोघांमुळे मुंबईने २० षटकांत ४ विकेट गमावून २५८ धावांचा डोंगर उभारला.

- Advertisement -

याचा पाठलाग करताना सिक्कीमला २० षटकांत ७ बाद १०४ इतकीच धावसंख्या करता आली. त्यांच्याकडून बिपुल शर्माने एकाकी झुंज देत ३२ धावा केल्या. मुंबईकडून शम्स मुलानी आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या, तर धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे आणि शुभम रांजणे यांनी १-१ विकेट घेतली.

संक्षिप्त धावफलक –
मुंबई : २० षटकांत ४ बाद २५८ (श्रेयस अय्यर १४७, सूर्यकुमार यादव ६३; मिलिंद कुमार २/३०) विजयी वि. सिक्कीम : २० षटकांत ७ बाद १०४ (बिपुल शर्मा ३२; शम्स मुलानी २/२, शार्दूल ठाकूर २/१३).

- Advertisement -

पुजारा नाबाद १००

भारतीय कसोटी संघाचा प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजाराने टी-२० मध्येही आपली कमाल दाखवली आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली करंडकाच्या रेल्वेविरुद्धच्या सामन्यात नाबाद १०० धावांची खेळी केली. हे टी-२० मधील त्याचे पहिले शतक होते. त्याच्या खेळीमुळे सौराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद १८८ इतकी धावसंख्या केली. मृणाल देवधर (४९) आणि प्रथम सिंग (४०) यांच्या चांगल्या फलंदाजीमुळे रेल्वेने १८९ धावांचे लक्ष्य १९.४ षटकांत गाठले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -