विजय क्लबला जेतेपद

श्री सिद्धेश्वर मंडळ कबड्डी

विजय क्लब संघाने श्री सिद्धेश्वर सेवा मंडळ आयोजित ज्युनियर जिल्हास्तरीय मनसे चषक कबड्डी स्पर्धेचे जेतेपद पटकावले. विजय क्लबच्याच सुधीर सिंगची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली. त्याला स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. ही स्पर्धा प्रभादेवी येथील राजाराम साळवी क्रीडांगणावर पार पडली.

दादरच्या विजय क्लबने अंतिम सामन्यात प्रभादेवीच्या सिद्धीप्रभा फाऊंडेशनचा ४८-९ असा धुव्वा उडवत मनसे चषक आपल्या नावे केला. तसेच त्यांना रोख रकमेचे पारितोषिकही मिळाले. अंतिम सामन्याच्या दुसर्‍या आणि संघाच्या पहिल्याच चढाईत विजय क्लबच्या सुधीर सिंगने तीन गडी टिपले. मात्र, सिद्धीप्रभाच्या विवेक मोरेने एका चढाईत ४ गडी टिपत आणि काही पकडी करत सामन्यात चुरस निर्माण केली. परंतु, रोशन भूतीया आणि विवेक सिंगच्या चांगल्या खेळामुळे विजय क्लबकडे मध्यंतराला २६-९ अशी आघाडी होती. यानंतर सिद्धीप्रभाचा खेळ अधिकच खालावला. उत्तरार्धात त्यांना एकही गुण मिळवता आला नाही. त्यामुळे विजय क्लबने हा सामना ४८-९ असा तब्बल ३९ गुणांच्या फरकाने जिंकला.
त्याआधी उपांत्य फेरीत विजय क्लबने विकास क्रीडा मंडळावर ५९-१४ अशी आणि सिद्धीप्रभा फाऊंडेशनने अमर क्रीडा मंडळावर २९-२२ अशी मात करत अंतिम फेरी गाठली होती.

विवेक मोरे सर्वोत्तम चढाईपटू
सिद्धीप्रभाच्या विवेक मोरेची श्री सिद्धेश्वर सेवा मंडळ कबड्डी स्पर्धेतील सर्वोत्तम चढाईचा खेळाडू, तर विजय क्लबच्या रोशन भूतीयाची सर्वोत्तम पकडीचा खेळाडू म्हणून निवड झाली. विकास मंडळाचा अवधूत शिंदे स्पर्धेतील लक्षवेधी खेळाडू ठरला. तिन्ही खेळाडूंना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.