घरक्रीडाशहरी व्यावसायिक गटात मुंबई बंदर अजिंक्य

शहरी व्यावसायिक गटात मुंबई बंदर अजिंक्य

Subscribe

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कबड्डी

मुंबई बंदर संघाने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित रौप्य महोत्सवी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या शहरी व्यावसायिक पुरुष गटाचे सलग दुसर्‍यांदा अजिंक्यपद मिळवले. त्यांचा शुभम कुंभार या गटातील सर्वोत्तम खेळाडू ठरला. ग्रामीण व्यावसायिक पुरुषांत रायगडच्या जे. एस. डब्ल्यू. स्टीललाही सलग दुसर्‍यांदा जेतेपद पटकावण्यात यश आले. त्यांच्या राज पाटीलला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला.

प्रभादेवी येथे झालेल्या या स्पर्धेतील शहरी व्यावसायिक पुरुषांच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या मुंबई बंदर संघाने सेंट्रल बँकेचा 28-14 असा पराभव केला. त्यांना कामगार चषक आणि रोख रकमेचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. या सामन्याच्या मध्यंतराला मुंबई बंदरकडे 11-9 अशी अवघ्या दोन गुणांची आघाडी होती. त्यानंतर मात्र मुंबई बंदरने आपला खेळ उंचावला. स्मितील पाटीलने 2 गडी टिपत बँकेवर लोण चढवला आणि मुंबई बंदरला 28-12 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर सेंट्रल बँकेला पुनरागमन करता आले नाही. त्यामुळे मुंबई बंदरने हा सामना तब्बल 14 गुणांच्या फरकाने जिंकला.

- Advertisement -

ग्रामीण व्यावसायिक पुरुषांच्या अंतिम सामन्यात जे.एस.डब्ल्यू. संघाने खुशबू आईस्क्रीमवर 33-30 अशी मात केली. या सामन्याच्या मध्यंतराला जे.एस.डब्ल्यू. संघ 11-16 असा पिछाडीवर पडला होता. मात्र, राहुल कोळी, राज पाटील, सूचित पाटील यांच्या आक्रमक खेळामुळे जे.एस.डब्ल्यू. संघाने दमदार पुनरागमन करत हा सामना 33-30 असा जिंकला. त्याआधी जे.एस.डब्ल्यू. संघाने अवचट इंडस्ट्रीजचा 42-29 असा, तर खुशबू आईस्क्रीमने इंदिरा सुत गिरणीचा 44-26 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.

महिलांत ठाणे मनपा विजयी

महिलांच्या अंतिम सामन्यात ठाणे मनपाने बँक ऑफ बडोदावर 30-24 अशी मात करत कामगार चषक आपल्या नावे केला. या सामन्याच्या पाचव्या मिनिटाला बँकेवर लोण देत मनपाने 11-8 अशी आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत त्यांनी ही आघाडी 17-8 अशी वाढवली. उत्तरार्धात बँकेने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी हा सामना सहा गुणांच्या फरकाने गमावला. कोमल देवकर, श्रद्धा पवारच्या चढाया आणि मेघा कदम, तेजस्वीनी पोटे यांची पकड यामुळे ठाणे मनपाने हा सामना जिंकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -