सिंधूचा पहिल्याच फेरीत पराभव

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा

Sindhu

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला ऑल इंग्लंड स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. तिचा दक्षिण कोरियाच्या सुंग जी ह्युनने २१-१६, २०-२२, २१-१८ असा पराभव केला. त्यामुळे सिंधूचे ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न पुन्हा अधुरेच राहिले. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या साई प्रणितने भारताच्याच एच. एस. प्रणॉयवर मात केली.

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीतील पहिल्या फेरीत पी. व्ही. सिंधूसमोर माजी वर्ल्ड नंबर २ सुंग जी ह्युनचे आव्हान होते. या सामन्याची सिंधूने चांगली सुरुवात करत पहिल्या गेममध्ये ६-४ अशी आघाडी घेतली होती. मात्र, ह्युनने दमदार पुनरागमन करत या गेमच्या मध्यांतराला ११-८ अशी आघाडी मिळवली. मध्यांतरानंतर सिंधूने चांगला खेळ करत १३-१३ अशी बरोबरी केली होती. पण, यानंतर सिंधूचा खेळ खालावला आणि ती १६-२० अशी पिछाडीवर पडली. ह्युननेच पुढील गुण मिळवत हा गेम २१-१६ असा जिंकला. दुसर्‍या गेममध्ये सिंधूने चांगल्या सुरुवातीनंतर पुन्हा चुका केल्यामुळे मध्यांतराला ती ८-११ अशी पिछाडीवर पडली. यानंतर ह्युनने आक्रमक खेळ करत २०-१७ अशी आघाडी मिळवली आणि पुढील गुण जिंकत तिला सामना सामना जिंकण्याची संधी होती. मात्र, सिंधूने जिद्दीने खेळ करत ४ गेम पॉईंट वाचवत २०-२० अशी बरोबरी केली. यानंतरचेही २ गुण मिळवत सिंधूने हा गेम २२-२० असा जिंकला.

त्यामुळे हा सामना तिसर्‍या आणि निर्णायक गेममध्ये गेला. तिसर्‍या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ केल्यामुळे मध्यांतराला ह्युनकडे ११-९ अशी अवघ्या २ गुणांची आघाडी होती. मध्यांतरानंतर ह्युनने आपल्या खेळाची गती वाढवत १८-११ अशी मोठी आघाडी मिळवली. मात्र, सिंधूने पुन्हा एकदा चांगले पुनरागमन करत तिची आघाडी १८-२० अशी कमी केली. मात्र, यापुढील गुण ह्युनने मिळवत हा गेम २१-१८ असा जिंकत सिंधूला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. पुरुष एकेरीत साई प्रणितने एच. एस. प्रणॉयला २१-१९, २१-१९ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. तसेच भारताची जोडी पूर्वीशा राम आणि मेघना जक्कमपुडीचाही पहिल्याच फेरीत पराभव झाला.

माझा दिवस नव्हता – सिंधू

पहिल्या फेरीतील पराभवानंतर पी. व्ही. सिंधू म्हणाली, मी ह्युनला सुरुवातीला खूप मोठी आघाडी मिळवू दिली. हे गुण खूप जास्त होते आणि त्यामुळे मला पुनरागमन करणे खूप अवघड झाले. मी मारलेले चांगले स्मॅशही नेटवर लागत होते. हा सामना खूप चांगला झाला आणि ह्युन या सामन्यात अप्रतिमरीत्या खेळली. मी या स्पर्धेसाठी खूप सराव केला होता. मात्र, आज माझा दिवस नव्हता. असे सामने होत असतात, पण आता मला अधिक मेहनत करून पुन्हा जोमाने कोर्टवर उतरण्याची गरज आहे