घरक्रीडासिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धा

सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धा

Subscribe

भारताच्या पी. व्ही. सिंधूने सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सायना नेहवालला मात्र दुसर्‍या सीडेड नोझोमी ओकुहाराचे आव्हान परतवून लावता आले नाही आणि तिला स्पर्धेबाहेर जावे लागले. पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांचाही पराभव झाला.

महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराने सायना नेहवालचा २१-८, २१-१३ असा सरळ गेममध्ये पराभव केला. या सामन्याआधी या दोघींमध्ये १३ सामने झाले होते. त्यापैकी ९ सामने सायनाने आणि ४ सामने ओकुहाराने जिंकले होते. मात्र, या सामन्यात सायनाला चांगला खेळ करता आला नाही. या सामन्याच्या पहिल्या गेममध्ये सायना ०-९ अशी पिछाडीवर होती. त्यानंतर तिला पुनरागमन करता आले नाही आणि तिने पहिला गेम ८-२१ असा गमावला. दुसर्‍या गेममध्ये मात्र सायनाने आपल्या खेळात सुधारणा केली. या गेमच्या मध्यंतराला ती ८-११ अशी तीनच गुण मागे होती. पण, पुढे ओकुहाराने आक्रमक खेळ करत सायनाला या गेममध्ये परत येण्याची संधी दिली नाही.

- Advertisement -

सायनाने हा गेम १३-२१ असा गमावला. पी. व्ही. सिंधूला मात्र आपला उपांत्यपूर्व फेरीतील सामना जिंकण्यात यश आले. तिने चीनच्या साय यानयानला २१-१३, १७-२१, २१-१४ असे पराभूत करत उपांत्य फेरी गाठली. या सामन्यातील पहिला गेम सिंधूने जिंकल्यानंतर यानयानने चांगले पुनरागमन करत दुसरा गेम जिंकला. त्यामुळे सामना तिसर्‍या आणि निर्णायक गेममध्ये गेला. या गेमची आक्रमक सुरुवात सिंधूने मध्यंतरापर्यंत ११-५ अशी आघाडी मिळवली. यानंतरही तिने आपला चांगला खेळ सुरु ठेवत हा गेम आणि सामना जिंकला. तिचा उपांत्य फेरीत सायनाला पराभूत करणार्‍या ओकुहाराशी सामना होईल.

पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतला पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्यपूर्व फेरीत त्याला जपानच्या अव्वल सीडेड केंटो मोमोटाने १८-२१, २१-१९, ९-२१ असे पराभूत केले. मोमोटाविरुद्ध श्रीकांतचा हा सलग नववा पराभव होता.

- Advertisement -

समीर वर्माही पराभूत

पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा समीर वर्माही पराभूत झाला. दुसर्‍या सीडेड चोऊ टीन चेनने समीरचा २१-१०, १५-२१, २१-१५ असा पराभव केला. समीरसाठी या सामन्याची चांगली सुरुवात झाली नाही आणि त्याने पहिला गेम २१-१० असा मोठ्या फरकाने गमावला. मात्र, दुसर्‍या गेममध्ये त्याने चांगले पुनरागमन करत हा गेम २१-१५ असा जिंकला. मात्र, तिसर्‍या गेममध्ये पुन्हा त्याचा खेळ खालावला आणि त्याने हा सामना गमावला. तसेच मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की रेड्डी यांना डेचपोल पुवारनुकरोह आणि सॅपसिरी या थायलंडच्या जोडीने १४-२१, १६-२१ असे पराभूत केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -