घरक्रीडासिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धा

सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धा

Subscribe

भारताची बॅडमिंटपटू पी. व्ही. सिंधूला मंगळवारपासून सुरू होणार्‍या सिंगापूर ओपन स्पर्धेमध्ये चांगल्या कामगिरीची आशा आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये बीडब्लूएफ वर्ल्ड टूर फायनल स्पर्धा जिंकणार्‍या सिंधूला मागील काही महिन्यांत चांगले प्रदर्शन करण्यात अपयश आले आहे. तिला ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या पहिल्याच फेरीत आणि मलेशिया ओपनच्या दुसर्‍या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. या दोन्ही स्पर्धांमध्ये तिचा कोरियाच्या सुंग जी ह्युनने पराभव केला होता.

सिंधूने नवी दिल्लीत झालेल्या इंडिया ओपन स्पर्धेत चांगली कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली होती. मात्र, उपांत्य फेरीत तिला चांगला खेळ करता आला नाही. या फेरीत चीनच्या हि बिंगजिओविरुद्धच्या सामन्यात सिंधूने पहिला गेम जिंकला होता, पण त्यानंतर तिचा खेळ खालावला आणि तिचा पराभव झाला. मागील आठवड्यातच मलेशिया ओपनच्या दुसर्‍या फेरीत पराभूत झालेल्या सिंधूला आपल्या खेळात बदल करण्यासाठी फार वेळ मिळालेला नाही. मात्र, तरीही चौथ्या सीडेड सिंधूला सिंगापूर ओपनमध्ये चांगली कामगिरी करण्याची आशा असेल. तिचा या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या लिअ‍ॅनी अलेसॅन्ड्रा मेनाकिशी सामना होणार आहे.

- Advertisement -

दुसरीकडे सायना नेहवालने या मोसमात चांगली कामगिरी केली आहे. अंतिम सामन्यात कॅरोलिना मरीनने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे तिने इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. या मोसमात जेतेपद पटकावणारी ती एकमेव भारतीय बॅडमिंटनपटू आहे. त्यानंतर तिने ऑल इंग्लंड स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. मात्र, दुखापतींमुळे तिला स्विस ओपन आणि इंडिया ओपन या स्पर्धांना मुकावे लागले होते. तिने मागील आठवड्यात मलेशिया ओपनमध्ये पुनरागमन केले होते. तिचा या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभव झाला. आता सिंगापूर ओपनच्या पहिल्या फेरीत तिच्यासमोर डेन्मार्कच्या होजमार्क कायर्सफेल्डचे आव्हान असणार आहे.

त्याचप्रमाणे पुरुषांमध्ये किदाम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, साई प्रणित, समीर वर्मा यांच्या कामगिरीवरही सार्‍यांची नजर असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -