घरक्रीडाSL vs SA : श्रीलंकेच्या प्रमुख क्रिकेटपटूला कोरोनाची बाधा

SL vs SA : श्रीलंकेच्या प्रमुख क्रिकेटपटूला कोरोनाची बाधा

Subscribe

कोरोनाची बाधा झाल्याने आता दोन आठवडे क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. 

श्रीलंकन क्रिकेट संघ पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे. परंतु, त्याआधीच श्रीलंकेचा संघ चिंतेत आहे. याचे कारण म्हणजे, श्रीलंकेचा प्रमुख यष्टीरक्षक-फलंदाज कुसाल परेराला कोरोनाची बाधा झाली आहे. मे महिन्यात श्रीलंकेच्या एकदिवसीय संघात मोठे बदल करण्यात आले होते आणि परेराची या संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली होती. त्याच्या नेतृत्वात श्रीलंकेला इंग्लंड दौऱ्यात फारसे यश लाभले नाही. त्यानंतर खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला भारताविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेला मुकावे लागले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळण्यासाठी तो सज्ज होता. परंतु, कोरोनाची बाधा झाल्याने त्याला आता दोन आठवडे क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.

२ सप्टेंबरपासून मालिकेला सुरुवात

रविवारी खेळाडूंची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली होती. यात परेराचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असे श्रीलंका क्रिकेटने (SLC) त्यांच्या पत्रकात म्हटले. दक्षिण आफ्रिकेच्या श्रीलंका दौऱ्याला २ सप्टेंबरपासून कोलंबो येथे सुरुवात होणार आहे. या दोन संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार असून त्यानंतर तीन सामन्यांची टी-२० मालिकाही खेळली जाणार आहे.

- Advertisement -

सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक

कुसाल परेरा हा श्रीलंकेचा प्रमुख यष्टीरक्षक आणि सलामीवीर आहे. परेराने आतापर्यंत १०७ एकदिवसीय सामन्यांत ३१.६५ च्या सरासरीने ३०७१ धावा, तर ५० टी-२० सामन्यांत २७.४८ च्या सरासरीने १३४७ धावा केल्या आहेत. तो सध्याच्या श्रीलंकन संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत श्रीलंकेला त्याची उणीव भासली होती. त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळेल अशी श्रीलंकन संघ व्यवस्थापनाला आशा आहे.


हेही वाचा – उर्वरित आयपीएलमध्ये खेळण्यास ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ‘हिरवा कंदील’!

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -