स्मिथ मानसिकदृष्टया खूप सक्षम!

तेंडुलकरची स्तुती

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टिव्ह स्मिथची स्तुती केली आहे. मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग प्रकरणातील सहभागामुळे स्मिथवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर त्याने अ‍ॅशेस मालिकेत पुनरागमन करताना ४ सामन्यांत ११०.५७ च्या सरासरीने ७७४ धावा काढल्या. स्मिथला इतके यश मिळत आहे, कारण तो मानसिकदृष्टया खूप सक्षम आहे, असे सचिनला वाटते.

अ‍ॅशेसमधील पहिल्या कसोटीत इंग्लंडचे गोलंदाज यष्टींमागे बाद करण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी त्यांनी गली आणि स्लिप ठेवल्या होत्या. मात्र, स्मिथने यष्टींसमोर येत चेंडू लेग साईडला मारले. तो खूपच हुशारीने खेळला. त्यानंतर लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात इंग्लंडने काही वेळा लेग स्लिप ठेवली होती. तसेच ते उसळी घेणारे चेंडू टाकत होते. तेव्हाच त्याला जोफ्रा आर्चरने अडचणीत टाकले, कारण त्याचे जास्त वजन मागच्या पायावर पडत होते.

स्मिथ काही वेळा चेंडू खेळण्यासाठी चुकीच्या जागी होता आणि त्यामुळे चेंडू त्याच्या डोक्याला लागला. अखेरच्या दोन सामन्यांत तो बरेच चेंडू सोडत होता. त्याने त्याच्या तंत्रात सुधारणा केली. त्यामुळे मी म्हणतो की, तो मानसिकदृष्टया सक्षम आहे आणि त्याचे तंत्र वेगळे आहे, असे सचिन म्हणाला.