नवी दिल्ली : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत (ICC World Cup 2023) भारतीय संघाने (India) न्यूझीलंडचा (New zealand) पराभव करत अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश केला आहे. बुधवारी (15 नोव्हेंबर) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stedium) पार पडलेल्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांच्या शतकी खेळीनंतर मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) 7 विकेट्सच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. मोहम्मद शमीचे हे प्रदर्शन भारतीय क्रीडाप्रेमी कधीही विसरणार नाहीत. त्याच्या गोलंदाजीचे सर्वांकडून कौतुक होत असताना त्याचे बालपणीचे प्रशिक्षक बदरुद्दीन (Badruddin) यांनी माध्यमांशी बोलताना शमीबद्दल अनेक गुपिते उघड केली आहेत. (so he had to stop bowling Coach Badruddin revealed many secrets about Mohammad Shami)
हेही वाचा – IND vs NZ : महेंद्रसिंग धोनीचे 10 वर्ष जुने ट्वीट होतेय व्हायरल; रवींद्र जडेजाबद्दल असे काय म्हटले?
अमरोहा या दुर्गम गावातून आलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आपल्या वेगवान गोलंदाजीने विश्वचषकात धुमाकूळ घालताना दिसत आहे. शमीने या विश्वचषकात आतापर्यंत फक्त 6 सामन्यात 23 विकेट पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज बनला आहे. शमीच्या या चमकदार कामगिरीमागे त्याचे प्रशिक्षक बदरुद्दीन यांची महत्त्वाची भूमिका आहे.
प्रशिक्षक बदरुद्दीन यांनी सांगितले की, 13-14 वर्षांचा असल्यापासून मोहम्मद शमी वेगवान गोलंदाजीच्या युक्त्या शिकण्यासाठी अमरोहापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरादाबादच्या सोनकपूर स्टेडियममध्ये यायचा. 2002 मध्ये शमीच्या वडिलांनी त्याला सोनकपूर स्टेडियमवर आणले होते. त्यावेळी वडिलांनी सांगितले होते की, शमीने अमरोहामध्ये आपल्या गोलंदाजीने खळबळ उडवून दिली आहे. यानंतर मी शमीला वॉर्म अप करायला सांगितले आणि त्याने सुमारे 30 मिनिटे गोलंदाजी केली. शमीने पहिल्या मिनिटाला टाकलेला चेंडू आणि 30व्या मिनिटाला टाकलेला चेंडू यात काही फरक नव्हता. त्याच दिवशी मला त्याची आवड कळली.
हेही वाचा – ICC World Cup 2023 : “साहबने बोला हैं…”; विश्वचषक अंतिम सामन्याआधी राज ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत
शमी 16 वर्षांचा झाला तेव्हा त्याने अंडर 19 साठी चाचणी दिली. तिथेही त्याने शानदार गोलंदाजी केली, पण शेवटच्या फेरीत तो बाद झाला. याचे त्याला खूप वाईट वाटले. पण त्यानंतर कठोर परिश्रम करण्यास तो प्रवृत्त झाला. शमी जूनच्या कडक उन्हातही सतत वेगवान गोलंदाजी करायचा. पण असे केल्याने तो आजारी पडू नये, यासाठी त्याला थांबवावे लागले होते. याच आवडीमुळेच तो जगातील सर्वोत्तम गोलंदाज बनू शकला, असा विश्वाच बदरुद्दीन यांनी व्यक्त केला.
विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये शमीला संधी मिळाली नाही. या प्रश्नाला उत्तर देताना बदरुद्दीन म्हणाले की, प्लेइंग इलेव्हनची निवड करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. हार्दिक पांड्याला दुखापत झाली. तो विश्वचषकातून बाहेर पडल्यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला. पण शमी सध्या करत असलेल्या कामगिरीमुळे भारतीय संघाला कशाचीही कमतरता जाणवताना दिसत नाही.
हेही वाचा – IND vs NZ : भारतीय संघाचा विजय वादात; न्यूझीलंड मीडियाकडून खेळपट्टीसंदर्भात आरोप
शमी वैयक्तिक आयुष्यातून पूर्णपणे सावरला
शमीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना बदरुद्दीन यांनी सांगितले की, शमीने सराव करून आपले मनगट इतके मजबूत केले आहे की तो गोलंदाजीत पारंगत झाला आहे. तो उत्कृष्ट नियंत्रणासह चेंडू स्विंग करत आहे. मी अनेकदा मुलांना सांगतो की जर त्यांना चांगला गोलंदाज व्हायचे असेल तर त्यांना त्यांच्या मनगटावर काम करावे लागेल. वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळातून शमी पूर्णपणे सावरला आहे. चांगला गोलंदाज म्हणून उदयास आला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यातही आम्हाला शमीकडून जादुची अपेक्षा असेल, असे बदरुद्दीन म्हणाले.