जाणून घ्या गावस्करांबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी!!!

गावस्करांच्या जीवनात ऑनफिल्डसोबतच ऑफफिल्डही अनेक किस्से घडले आहेत. त्याच किस्स्यांचा थोडक्यात घेतलेला आढावा...

Sunil-Gavaskar
सुनिल गावस्कर

भारतीय क्रिकेटमधील एक दिग्गज फलंदाज म्हणून ओळखले जाणारे सुनील गावस्कर यांचा आज ६९ वा वाढदिवस. गावस्करांना भारतीय क्रिकेट सोबतच जागतिक क्रिकेटमध्येही मोठा मान आहे. गावस्करांच्या जीवनात ऑनफिल्डसोबतच ऑफफिल्डही अनेक किस्से घडले आहेत. त्याच किस्स्यांचा हा थोडक्यात आढावा…

१. काकांनी तारलं सुनील गावस्करांना

भारतीय क्रिकेटला सुनील गावसकरांसारखा उत्कृष्ट खेळाडू मिळालाच नसता जर त्यांच्या जन्मावेळी त्यांचे काका हॉस्पीटलमध्ये नसते. कारण जन्मानंतर सुनीलजी एका दुसऱ्या नवजात मुलासोबत बदली झाले होते. मात्र त्यांच्या काकांनी बाळाच्या डाव्या कानाजवळील तीळ ओळखले आणि त्यामुळे सुनीलजी पुन्हा त्यांच्या घरातल्यांना मिळाले.

२. ‘गावस्कर’ एक क्रिकेटमय कुटुंब

सुनील गावस्करांच्या कुटुंबात सुनील हे एकटेच क्रिकेटर नसून त्यांचे मामा माधव मंत्री यांनीही भारताकडून ४ कसोटी सामने खेळले आहेत. याचसोबत गावस्करांचा मुलगा रोहनने ११ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याचसोबत भारताचे माजी फलंदाज जी. आर. विश्वनाथ हे गावस्कर यांचे मेहूणे आहेत. गावस्करांची बहीण, नूतन या देखील मुंबईतील पहिल्या महिला क्लबतर्फे क्रिकेट खेळल्या होत्या.

३. गावस्कर होणार होते ‘कुस्तीपटू’

गावस्कर क्रिकेटर बनण्याआधी कुस्तीपटू बनू इच्छित होते. प्रसिद्ध कुस्तीपटू मारुती वडार यांचे ते मोठे चाहते होते. मात्र त्यांनी त्यांचे मामा माधव मंत्री यांना भारताकडून क्रिकेट खेळताना पाहिले आणि त्यांनीही क्रिकेटर होण्याचा निर्णय घेतला.

४. शालेय जीवनातच गाठले क्रिकेटचे शिखर

सुनीलजींनी शालेय क्रिकेटमध्ये असताना माध्यमिक शिक्षणाच्या अंतिम वर्षात नाबाद २४६,२२२ आणि ८५ अशा अप्रतिम धावांची खेळी केली होती. यानंतर त्यांनी मुंबईच्या प्रसिद्ध कॉलेज सेंट जेवियर्सकडून खेळत कॉलेज क्रिकेटमध्ये आपले उत्तम पदार्पण केले.

५. पहिल्याच सामन्यातच मिळाला ‘डक’

गावस्करांनी पहिला रणजी सामना १९६८-६९ साली खेळला. ज्यात कर्नाटकविरूद्धच्या पहिल्याच सामन्यात एकही धाव न करता आऊट झाले.

६. बालपणीचे स्वप्न केले पूर्ण

गावस्करांचे लहाणपणापासूनच स्वप्न होते की, कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजवर विजय मिळवायचा. गावस्करांनी १९७१ च्या दौऱ्या दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण केले. पहिला सामना दुखापतीमुळे ते खेळले नाही, मात्र त्यानंतरच्या दोन्ही सामन्यात त्यांनी ६५ आणि ६७ धावा केल्या, विशेष म्हणजे या सामन्यात त्यांच्या या विजयी धावा ठरल्या.

७. एका खेळाडूकडून मालिकेतील सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम

सुनील गावस्करांनी वेस्ट इंडिजविरूद्धच्या पदार्पणाच्या मालिकेत १५४.८० च्या सरासरीने ७७४ धावा केल्या ज्यात ४ शतकांचा आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे.

८. गावस्करांची भीती

आपल्या हातातील बॅटने सर्व बॉलर्सना घाबरवून सोडणारे गावस्कर मात्र घाबरतात ते कुत्र्याला. इंग्लिश अष्टपैलू खेळाडू इयन बोथम यांनी गावस्करांना कुत्र्याची भीती दाखवून एका टेलीफोन बुथमध्ये डांबून ठेवले होते.

९. अन गावस्करांची मैदानातच झाली चंपी

गावस्करांसोबत ऑनफिल्ड आणि ऑफफिल्ड बऱ्याच विचित्र घटना घडल्या. एकदा गावस्कर १९७४ साली ओल्ड ट्रॅफर्डमध्ये खेळत होते तेव्हा त्यांचे वाढलेले केस गावस्कर त्यांच्या डोळ्यापुढे येत होते. त्यामुळे त्यांना फलंदाजी करण्यास अडचण होत होती. अखेर गावस्कर यांनी पंच डिकी बर्ड यांना ते केस कापून टाकण्याची विनंती केली. त्याकाळी चेंडूची शिवण कापण्यासाठी पंचांजवळ कात्री असायची. गावस्कर यांची फलंदाजीत येणारी अडचण लक्षात घेत बर्ड यांनी त्या कात्रीने त्यांचे डोळ्यापुढे येणारे केस कापले होते. त्यावेळी ‘पंचांना काय करावे लागेल, हे सांगता येत नाही’, असे पंच बर्ड म्हणाले असल्याचेही गावस्कर यांनी नंतर सांगितले होते.

१०. मोठ्या पडद्यावरही झळकले होते गावस्कर

गावस्कर यांनी १९७४ साली आलेल्या ‘सावली प्रेमाची’ मराठी चित्रपटात मुख्य भूमिका बजावली होती. त्याचसोबत त्यांना १९८८ साली नसीरुद्दीन शाहच्या चित्रपट ‘मालामाल’मध्ये पाहुणे कलाकार म्हणून काम केले होते.