IND vs ENG Women : इंग्लंडचा मालिका विजय; भारतीय महिला संघावर ५ विकेट राखून मात

इंग्लंडकडून सोफिया डंकलीने नाबाद ७३ धावांची मॅचविनिंग खेळी केली.

england women beat india women
सोफिया डंकली आणि कॅथरीन ब्रंटच्या ९२ धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे इंग्लंड महिला संघाची भारतावर मात

फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीचा फटका पुन्हा एकदा भारतीय महिला संघाला बसला. टाँटन येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने भारतावर ५ विकेट राखून मात केली. या विजयासह इंग्लंड महिला संघाने तीन सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २२१ अशी धावसंख्या केली होती. याचा पाठलाग करताना इंग्लंडची ५ बाद १३३ अशी अवस्था होती. परंतु, सोफिया डंकलीने ८१ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ७३ धावांची खेळी करत इंग्लंड संघाला विजय मिळवून दिला.

मिताली राजची ५९ धावांची खेळी

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी ५६ धावांची सलामी देत भारताच्या डावाची चांगली सुरुवात केली. मात्र, मध्यम गती गोलंदाज केट क्रॉसने मानधना (२२) आणि जेमिमा रॉड्रिग्स (८) यांना झटपट बाद केले. तर सोफी एकलेस्टोनने शेफालीला (४४) माघारी पाठवत भारताला अडचणीत टाकले. यानंतर कर्णधार मिताली राजने ५९ धावांची खेळी केली. परंतु, तिला इतरांची फारशी साथ न लाभल्याने भारताचा डाव ५० षटकांत २२१ धावांवर आटोपला. इंग्लंडच्या केट क्रॉसने ३४ धावांत ५ विकेट घेतल्या.

डंकलीला जोन्स आणि ब्रंटची साथ

२२२ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सलामीवीर लॉरेन विनफिल्ड-हिलने ४२ धावांची खेळी केली. तिच्या व्यतिरिक्त इंग्लंडच्या आघाडीच्या फळीतील फलंदाज मोठी खेळी करू शकल्या नाहीत. मात्र, सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डंकलीने उत्कृष्ट फलंदाजी करत ८१ चेंडूत नाबाद ७३ धावांची खेळी केली. तसेच तिने एमी जोन्स (२८) सोबत पाचव्या विकेटसाठी ४१ धावांची, तर कॅथरीन ब्रंट (नाबाद ३३) सोबत सहाव्या विकेटसाठी ९२ धावांची अभेद्य भागीदारी रचत इंग्लंडला विजय मिळवून दिला.