एसआर ग्रुपची उपांत्य फेरीत धडक, युनियन क्रिकेट क्लबवर केली मात

हार्दिक तामोरे आणि सिद्धार्थ म्हात्रेने सलामीला त्यानंतर आनंद बैस आणि बीन्स नेय्योथने तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात एसआर ग्रुपने एका विकेटने युनियन क्रिकेट क्लबला मात देत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित पालकमंत्री चषक टिपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. सागर मिश्राने ७६ आणि सचिन यादवने ५२ धावांची खेळी करत युनियन क्रिकेट क्लबला २० षटकात ३ बाद २०० धावा उभारुन दिल्या. या डावात निखिल पाटीलने १७ धावांत २ आणि अश्विन माळीने एक फलंदाज बाद केला.

या आव्हानाला सामोरे जाताना हार्दिक तामोरेने ४६ आणि आनंद बैसने ५७ धावांची खेळी करत पहिल्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर आनंद बैस आणि बीन्स नेय्योथने तिसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. पण मधल्या फळीतल्या फलंदाजांनी निराशा केल्यामुळे एसआर ग्रुपचा संघ अडचणीत आला होता.

जय पराजयाच्या उंबरठ्यावर शेवटच्या जोडीने काही आकर्षक फटके मारत संघाला उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा करुन दिला. साइराज पाटीलने तिन, सुमित मरकलीने दोन आणि हर्ष पंत, मित सोमणीने प्रत्येकी एक विकेट मिळवली.


हेही वाचा : IPL 2022: टाटा यांचे ‘ते’ चॅलेंज रोहितने केलं पूर्ण; सर्वत्र होतेय चर्चा