घरक्रीडाससेहोलपट

ससेहोलपट

Subscribe

माजी विजेता तसेच लागोपाठ दोनदा उपविजेत्या ठरलेल्या श्रीलंकेची इंग्लंडमध्ये वारंवार त्रेधातिरपीट उडते. इंग्लंडमधील ४ वर्ल्डकपमध्ये १७ पैकी चारच सामने त्यांनी जिंकले आहेत. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सलामीच्या लढतीतच किवीजनी त्यांचा दारुण पराभव केला. भारतीय उपखंडात चांगली कामगिरी करणार्‍या श्रीलंकेची वनडेतील कामगिरी अत्यंत ढिसाळ होत चालली आहे. वनडे क्रमवारीत नवव्या क्रमांकावर त्यांची घसरण झाली असून, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्यांचा डाव अवघ्या १३६ धावांतच आटोपला. जेमतेम ३० षटकात त्यांचा सारा संघ गारद होत असताना कर्णधार दिमुथ करुणारत्ने सलामीला येऊन अखेरपर्यंत किल्ला लढवत नाबाद राहण्याची कामगिरी केली. वर्ल्डकपमध्ये अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा सलामीवीर. वीस वर्षांपूर्वी इंग्लंडमधील वर्ल्डकप स्पर्धेत विंडीजच्या रिडली जेकब्सने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद ४९ धावा फाटकावल्या होत्या. कर्णधाराने किल्ला लढवूनदेखील श्रीलंकेला १३६ पर्यंतच मजल मारता आली. भरवशाच्या अँजेलो मॅथ्यूजला भोपळाही फोडता आला नाही.

द.आफ्रिकेत अलीकडेच कसोटी मालिका जिंकणार्‍या करुणारत्नेच्या श्रीलंकन संघाची वनडेतील कामगिरी खालावतच चालली आहे. वर्ल्डकपच्या चमूतील १५ पैकी ५ खेळाडू तर गेली दीड वर्षे वनडेत खेळलेले नाहीत. जीवन मेंडिस, कर्णधार करुणरत्ने यांनी तर जवळपास चार वर्षांनंतर श्रीलंकन वनडे चमूत पुनरागमन केले आहे. दीर्घ कालावधीनंतर वनडेमध्ये खेळणे सोपे नसते. ‘सुरुवातीला माझ्यावर विलक्षण दडपण होते, पण त्यातून माझ्या धावा झाल्या आणि माझा आत्मविश्वास दुणावला’, असे करुणारत्ने म्हणाला. सोफिया गार्डन, कार्डिफ येथील लढतीत नाणेफेक जिंकल्यावर केन विल्यमसनने गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि सकाळच्या सत्रात चेंडू स्विंग, सीम होत असल्यामुळे त्याचा फायदा गोलंदाजांनी उठवला. ‘सराव सामन्यांत आम्ही चांगली फलंदाजी केली होती, पण कार्डिफमध्ये आमची फलंदाजी ढेपाळली. या पुढच्या सामन्यात मात्र आम्हाला काळजी घ्यावी लागेल’, अशी पुस्ती श्रीलंकन कर्णधाराने जोडली.

- Advertisement -

वर्ल्डकपसाठी श्रीलंकन चमूतून दिनेश चंडीमल, निरोशन डिकवेला, अकिला धनंजय, उपुल तरंगा, दासून शनाका यांना डच्चू देण्यात आला. खासकरून चंडीमलला वगळल्यामुळे नाराजीचे सूर उमटले. श्रीलंकेचे ९ पैकी ६ सामने उत्तर इंग्लंडमधील कौंटी स्टेडियमवर खेळले जातील. मोसमाच्या पूर्वार्धात थंड वातावरणात चेंडू स्विंग होत असल्यामुळे तसेच श्रीलंकेच्या आक्रमणाचा भर फिरकीवर असल्यामुळे त्यांची या स्पर्धेत कसोटीच लागेल. सलामीच्या झुंजीत हेन्री, फर्ग्युसन, बोल्ट या किवीजच्या त्रिकुटासमोर श्रीलंकेची दाणादाण उडाली. मंगळवारी कार्डिफ येथेच श्रीलंकेचा सामना अफगाणिस्तानशी होईल. या सामन्यात त्यांना अफगाणिस्तानकडून कडवा प्रतिकार होण्याची शक्यता दिसते.

कुसाल मेंडिस, कुसाल परेरा या यष्टीरक्षक-फलंदाजांवर श्रीलंकन फलंदाजीची भिस्त आहे. परेराने पहिल्या सामन्यात २४ चेंडूत २९ धावा तडकावल्या. मेंडिसला मात्र खातेही उघडता आले नाही. या दोघांसह सलामीवीर थिरीमनेची रवानगी पॅव्हेलियनमध्ये केली ती मॅट हेन्रीनेच. थिसारा परेराने २7 धावा फटकावताना कर्णधार करुणारत्नेच्या साथीने अर्धशतकी भागीदारी केली, परंतु सँटनरच्या फिरकीने त्याला चकवले. कर्णधार करुणारत्नेला सहकार्‍यांची साथ लाभली नाही. फलंदाजीप्रमाणेच लंकेची गोलंदाजीही निष्प्रभ ठरली. त्यामुळे त्यांचा पराभव अटळच होता.

- Advertisement -

श्रीलंकन क्रिकेटला अंतर्गत कलह, गटबाजीने पोखरले असून, त्याचा विपरीत परिणाम खेळावर होत आहे. १९९६ मध्ये लाहोरच्या गडाफी स्टेडियमवर बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवून वर्ल्डकप जिंकण्याची किमया केली, परंतु त्यानंतर इंग्लंडमधील वर्ल्डकप स्पर्धेत (१९९९) त्यांचा प्रभाव पडला नाही. इंग्लंडमधील स्विंग, सीम गोलंदाजीवर त्यांची डाळ शिजली नाही. २००७, २०११ या लागोपाठच्या वर्ल्डकपमध्ये त्यांनी अंतिम फेरी गाठली. मात्र, त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कुमार संगकारा, महेला जयवर्धने या दोन महान खेळाडूंच्या निवृत्तीनंतर श्रीलंकन क्रिकेटची अधोगती सुरूच आहे.

या स्पर्धेच्या पूर्वार्धात पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान या आशियाई संघांना स्विंग, सीम गोलंदाजीचा सामना करणे कठीण जाईल. खेळपट्ट्या पाटा असतील आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात सामने खेळले गेले तर त्यांचा प्रभाव पडेल. मात्र, आभाळात ढग आले की त्यांची लेझीम सुरू होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -