घरIPL 2020IPL 2020 : स्ट्राईक रेटला उगाचच खूप महत्त्व - लोकेश राहुल  

IPL 2020 : स्ट्राईक रेटला उगाचच खूप महत्त्व – लोकेश राहुल  

Subscribe

राहुलला सुरुवातीच्या षटकांत वेगाने धावा करण्यात अपयश येत आहे.

किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार आणि सलामीवीर लोकेश राहुलने यंदाच्या आयपीएलमध्ये चांगला खेळ केला आहे. यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राहुल अव्वल स्थानावर आहे. त्याने सहा सामन्यांत ३१३ धावा केल्या असून यात दोन अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे. मात्र, राहुलला सुरुवातीच्या षटकांत वेगाने धावा करण्यात अपयश येत आहे. त्याने पॉवर-प्लेमध्ये केवळ ११३.३ स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर टीकाही होत आहे. मात्र, माझ्यासाठी चांगल्या स्ट्राईक रेटपेक्षा संघाला सामने जिंकवून देणे जास्त महत्त्वाचे आहे, असे राहुल म्हणाला.

जबाबदारी घेऊन खेळणे गरजेचे

स्ट्राईक रेटला उगाचच खूप महत्त्व दिले जाते. माझ्यासाठी मी माझ्या संघाला सामने कसे जिंकवून देऊ शकतो हे सर्वात महत्त्वाचे आहे. एखाद्या दिवशी माझ्या संघाने सामना जिंकण्यासाठी मी संयमाने फलंदाजी करून केवळ १२० च्या स्ट्राईक रेटने धावा करणे आवश्यक असेल, तर ते करण्याची माझी तयारी असते. मी अशाचप्रकारे फलंदाजी करतो. कर्णधार म्हणून मी जबाबदारी घेऊन खेळणे गरजेचे आहे. आपण सर्वच जण चुकतो. मीसुद्धा चुका केल्या आहेत. मात्र, कर्णधार म्हणून प्रत्येक दिवशी मी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असल्याचे हैदराबादविरुद्धच्या सामन्यानंतर राहुलने सांगितले.

- Advertisement -

प्रत्येक खेळाडूला विशेष भूमिका  

खेळपट्टीवर एका वेळी दोन फलंदाज असतात. प्रत्येक संघ सर्व खेळाडूंना विशेष भूमिका देतो आणि प्रत्येक खेळाडूने त्यानुसार खेळणे आवश्यक असते. प्रत्येक सामन्यात, तसेच सामन्यादरम्यान ही भूमिका बदलत जाते. सामन्याची परिस्थिती कशी आहे, हे पाहून त्यानुसार खेळाडूने त्याच्या खेळात बदल करणे गरजेचे असते. सामन्याअंती मी नेहमी समाधानी असतो. मी माझ्या संघाला सामना जिंकवून देण्याचा पूर्ण प्रयत्न केला हे मला ठाऊक असते, असेही राहुल म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -