मूर्ख सर्फराज!

भारताविरुद्धच्या पराभवानंतर अख्तरची टीका

सर्फराज

भारताविरुद्धचा विश्वचषकातील सामना गमावल्यामुळे माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदवर जोरदार टीका केली आहे. तसेच यापुढील सामन्यांत पाकिस्तानच्या साधारण खेळाडूंकडून उत्कृष्ट खेळाची अपेक्षा करू नका, असा सल्लाही अख्तरने चाहत्यांना दिला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर भारताने ३३६ धावांचा डोंगर उभारला, ज्याचा पाठलाग करताना डकवर्थ-लुईस नियमानुसार पाकिस्तानला ४० षटकांत ३०२ धावा करणे गरजेचे होते. मात्र, त्यांना २१२ धावाच करता आल्याने त्यांचा पराभव झाला.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने ज्या चुका केल्या, त्या चुका पाकिस्तानने विश्वचषकातील या सामन्यात केल्या. मला कळत नाही की सर्फराज इतका मूर्खपणे कसा वागू शकतो. पाकिस्तानी संघ धावांचा पाठलाग करताना चांगली फलंदाजी करत नाही हे तो कसे विसरला. तुमची बलस्थाने काय आहेत, याची कल्पना असणे गरजेचे असते. गोलंदाजी ही पाकिस्तानची जमेची बाजू आहे. पाकिस्तानने जेव्हा नाणेफेक जिंकले, तेव्हाच त्यांनी अर्धा सामना जिंकला होता, मात्र सर्फराजमुळे पाकिस्तानचा पराभव झाला.

त्यांनी प्रथम फलंदाजी करताना २६० धावा जरी केल्या असत्या, तरी भारताला यापेक्षा कमी धावांवर रोखण्यास पाकिस्तानचे गोलंदाज सक्षम आहेत. त्यामुळे सर्फराजचा निर्णय अतिशय मूर्खपणाचा होता. पाकिस्तानच्या कर्णधाराने इतकी वाईट कामगिरी करणे ही चांगली गोष्ट नाही. मला त्याच्यामध्ये इम्रान खानची छटा पाहायची होती, पण आता तसे होणार नाही, असे अख्तर म्हणाला.