घरक्रीडाIND vs ENG : अजिंक्य रहाणेकडून काही जणांना धोका जाणवतो; गावस्करांचे सूचक...

IND vs ENG : अजिंक्य रहाणेकडून काही जणांना धोका जाणवतो; गावस्करांचे सूचक विधान

Subscribe

एकट्या रहाणेला लक्ष्य केले जात आहे, असे वाटू नये म्हणून उगाचच पुजाराचे नावही घेतले जाते.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला बुधवारपासून सुरुवात होत आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या भारताच्या सिनियर फलंदाजांवर धावा करण्यासाठी दबाव आहे. पुजाराला मागील ३१ कसोटी डावांमध्ये शतक करता आलेले नाही. तर रहाणेने मागील १६ कसोटी डावांत केवळ एक शतक केले आहे. त्यामुळे या दोघांचे कसोटी संघातील स्थान धोक्यात असल्याचे म्हटले जात आहे. परंतु, भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर या दोघांना संघातून वगळण्याच्या पक्षात नाहीत. तसेच विशेषतः रहाणेकडून काही जणांना धोका जाणवत असल्याचे विधान त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केले.

खरा निशाणा रहाणेवर

रहाणे आणि पुजारा यांना मिळणारी वागणूक योग्य नाही. त्यांनी भारतीय संघासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आहे. माझ्या मते, आता रहाणे आणि पुजाराविरुद्ध गुपचूप चर्चा केल्या जात आहेत. मागील सहा-आठ महिन्यांत या दोघांपेक्षा सातत्याने धावा करणाऱ्या फलंदाजाचे नाव सांगा. काही जणांचा खरा निशाणा रहाणेवर आहे. एकट्या रहाणेला लक्ष्य केले जात आहे, असे वाटू नये म्हणून उगाचच पुजाराचे नावही घेतले जाते. रहाणेसारखा खेळाडू संघात असणे खूप फायदेशीर असते. परंतु, काही जणांना त्याच्याकडून धोका जाणवत आहे, असे गावस्कर म्हणाले.

- Advertisement -

नक्की हेतू काय हे पाहावे लागेल

रहाणेविरुद्ध मोहीम सुरु झाली आहे. परंतु, त्याच्यापासून कोणालाही धोका नाही. ऑस्ट्रेलियात भारतीय संघ ३६ धावांत गारद झाला. परंतु, पुढच्याच सामन्यात रहाणेने शतक झळकावले. तसेच गॅबा येथे त्याने आक्रमक शैलीत खेळ केल्याने भारतीय संघाचा विश्वास वाढला. भारतात फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर रहाणेने अर्धशतक केले. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात त्याने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या. असे असतानाही त्याच्या आणि पुजाराच्या कसोटी संघातील स्थानाबाबत अचानक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामागे नक्की हेतू काय हे पाहावे लागेल, असेही गावस्कर यांनी या मुलाखतीत सांगितले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -