अहमदाबाद : ICC Cricket World Cup 2023 च्या अंतिम सामन्यात भारताला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. विश्वचषकात सलग 10 सामने जिंकून सुद्धा भारताला शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभूत करत विश्वचषक 2023 स्वतःच्या नावे केला. यामुळे 140 करोड भारतीयांची मने दुखावली आहेत. स्वतः कर्णधार रोहित शर्मा याला त्याचे रडू आवरता आले नाही. पण रोहित शर्माने जर का ती एक चूक केली नसती तर सामन्यात मोठा फरत पडला असता, असे म्हणत भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी कर्णधार रोहित शर्मा याची चूक दाखवून दिली आहे. रोहित शर्माने संपूर्ण विश्वचषकात भारताचे उत्तम नेतृत्व केले. त्याने सर्व सामन्यात आक्रमक आणि तितकीच शांत खेळी करत भारताला सलग 10 सामने विजयी करण्यात मोठी जबाबदारी पार पाडली. ऑस्ट्रेलियाच्या विरोधात खेळलेल्या अंतिम सामन्यातही रोहितने आक्रमकपणे सुरुवात केली. परंतु, मोठा फटका मारताना रोहित शर्मा अर्धशतकाला तीन धावा कमी असताना म्हणजेच 47 धावांवर बाद झाला. याबाबत सुनील गावसकर यांच्याकडून मोठे वक्तव्य करण्यात आले आहे. (Sunil Gavaskar pointed out Rohit Sharma’s big mistake in the final match)
हेही वाचा – ऑस्ट्रेलियातील प्रसार माध्यमांची भारतावर टीका; वाचा, काय आहे कारण?
कर्णधार रोहित शर्माच्या खेळीबाबत बोलताना सुनील गावसकर म्हणाले की, रोहित शर्मा हा चांगल्या लयीत फलंदाजी करत होता. रोहित हा असाच त्याच्या पद्धतीने क्रिकेट खेळतो. रोहितने ग्लेन मॅक्सवेलच्या षटकात एक चौकार आणि एक षटकार लगावला होता. त्यामुळे दोन चेंडूत 10 धावा आलेल्या होत्या. त्यानंतर रोहितला मोठा फटका मारण्याची गरज नव्हती. कारण त्यावेळी ज्या धावा मिळवायच्या होत्या, त्या आल्या होत्या. त्यामुळे रोहितला मोठा फटका मारण्याची गरज नव्हती. पण रोहित मोठा फटका मारायला गेला आणि त्याच्याकडून मोठी चूक झाली. कारण रोहित आपली विकेट गमावून बसला होता. जर तो फटका योग्य लागला असता तर षटकारच गेला असता आणि सर्वांनी टाळ्यादेखील वाजवल्या असत्या. पण तसे घडले नाही. त्यानंतर बरीच षटके खेळायची बाकी होती. त्यामुळे रोहितने जर अपील विकेट तेव्हा राखली असती तर सामन्यात मोठा फरक पडला असता, असे मला वाटते.
रोहितने मोठा फटका मारण्याच्या नादात केलेल्या चुकीमुळे सर्वांकडूनच याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आले. रोहितच्या आधी शुभमन गील अतिशय स्वस्तात बाद झाला होता. त्यामुळे रोहित शर्मा सावकाश खेळ खेळेल, अशी सर्व प्रेक्षकांना अपेक्षा होती. मात्र, नेहमीप्रमाणे रोहितने आक्रमक खेळ खेळण्याचा प्रयत्न केला. ज्यात त्याला बाद व्हावे लागले. तर त्यानंतर के. एल. राहूल आणि विराट कोहली वगळता कोणालाही चांगली खेळी करता आली नाही. ज्यामुळे सलग 10 सामने जिंकून बलाढ्य संघ असलेल्या भारताला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला.