नवी दिल्ली : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावली. तसेच, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या शर्यतीतूनही बाहेर पडली. विशेष म्हणजे भारतीय संघ हा या सुरुवातीपासूनच अव्वल स्थानावर होता. पण न्यूझीलंडविरुद्ध 3 – 0 असा व्हाईट वॉश तर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 – 1 असा पराभव यामुळे अव्वल स्थान गमावले आणि स्पर्धेतून बाहेर पडली. पण यानंतर अनेकांनी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मावर टीका केली. यामध्ये भारताचे ज्येष्ठ माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचादेखील समावेश आहे. त्यांनी गेल्या काही काळापासून अनेकदा भारतीय संघातील खेळाडूंवर टीका केली आहे. (Sunil Gavaskar Predicts India’s Next Captain After Rohit Sharma)
हेही वाचा : Gautam Gambhir : माजी क्रिकेटरची गौतम गंभीरवर टीका; नितीश राणाचीही वादात उडी
एका चॅनलशी बोलताना माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय कसोटी संघाचा पुढील कर्णधार आहे, अशी भविष्यवाणी केली. ते म्हणाले की, “मला वाटते की जसप्रीत बुमराह हा पुढचा कर्णधार होऊ शकतो. कारण त्याची नेतृत्व करण्याची क्षमता चांगली आहे.” दरम्यान, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या आणि शेवटच्या सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत बुमराहने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्यावेळी पर्थमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 295 धावांनी विजय मिळवला होता. तर, सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत बुमराहने कर्णधारपद सांभाळले. तेव्हा भारतीय संघाला 6 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता.
माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले की, “अनेकदा तुमच्याकडे असे कर्णधार असतात, जे खेळाडूंवर दबाव टाकतात. पण तो (बुमराह) असा कर्णधार नाही. तो खेळाडूंवर दबाव टाकत नाही. खेळाडूंनी आपले काम करत राहावे, अशी त्याची अपेक्षा असते. त्यांच्यावर अतिरिक्त दबाव आणत नाही. बुमराह जलदगती गोलंदाजीच्या बाबतीत उत्कृष्ट असून तो मिड-ऑफ किंवा लाँग-ऑफमध्ये उभा राहतो. तसेच इतरांचे मार्गदर्शनही करतो. त्याने लवकरच कर्णधारपद स्वीकारले तर मला आश्चर्य वाटणार नाही.” असे बोलून दाखवले आहे.
रोहित शर्माचे कर्णधारपद धोक्यात तर बुमराह दावेदार
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावल्यानंतर रोहित शर्माचे कर्णधारपद धोक्यात आले आहे. कारण, गेल्या काही सामन्यांपासून तो चांगल्या धावा करू शकलेला नाही. बॉर्डर-गावस्कर स्पर्धेत रोहित शर्माने फक्त 31 धावा केल्या आहेत. तर, संपूर्ण WTC 2023 – 2025 मध्ये 17 सामन्यात 31 डावांमध्ये 28.80च्या सरासरीने 864 धावाच केल्या आहेत. तेच जसप्रीत बुमराहने कसोटीत चांगली कामगिरी केली आहे. त्याने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 5 सामन्यात 9 डावांमध्ये 13.06 च्या सरासरीने 32 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, WTC 2023 – 2025मध्ये त्याने 15 सामन्यात 28 डावांमध्ये 15.09 च्या सरासरीने 77 विकेट्स घेतल्या. त्यामुळे याआधीही रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेऊन ते बुमराहला देण्यात यावे, अशी मागणी अनेकदा झाली आहे.